धक्कादायक : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्याने केला आईचा खून
![Shocking: Pimpri-Chinchwad, Municipal Corporation, employee committed, mother's murder,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Pune-Crime-1-780x470.jpg)
पिंपरी: कामावर का गेला नाही, अशी विचारणा केल्याचा राग आल्याने महापालिकेच्या कचरा वेचक कामगाराने सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना ९ मार्च रोजी घडली असून याप्रकरणी बुधवारी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रयागबाई अशोक शिंदे (वय ५८) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा विश्वास अशोक शिंदे (वय ३० रा. निराधारनगर, पिंपरी) याला अटक केली आहे. याबाबत पिंपरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वसंत डोंब यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी विश्वास हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा गाडीवर नोकरीला आहे. तो आईसोबत पिंपरीत राहत होता. विश्वास कामावर न जात घरीच असल्याने आईने त्याला कामावर का गेला नाही अशी विचारणा केली. दारुचे व्यसन सोडण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरुन विश्वास याने घराबाहेरुन सिमेंटचा गट्टू आणला. आईच्या डोक्यात मारला. त्यामुळे मेंदतून रक्तस्राव झाला. श्वसन क्रिया बंद पडल्याने प्रयागबाई यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.