पश्चिम बंगालमध्ये ‘शिंदे पॅटर्न’ची पुनरावृत्ती! ५९ बंडखोरांसह तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट; ऋतब्रता बॅनर्जी ठरले नवे विरोधी पक्षनेते

Mamata Banerjee | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोड घडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात अखेर मोठी फूट पडली असून पक्षाच्या ५९ बंडखोर आमदारांच्या गटाला पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिली आहे. या बंडखोर गटाचे नेतृत्व करणारे आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांची विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. या धक्कादायक घडामोडीमुळे ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच ममता बॅनर्जी यांनी बंडखोरी रोखण्यासाठी आमदार ऋतब्रता बॅनर्जी आणि आमदार संदीपान साहा यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी केली होती. मात्र, पक्षाचा हा निर्णय ममता यांच्यावरच उलटला. ऋतब्रता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ तब्बल ५९ आमदार एकत्र आले आणि त्यांनी स्वतंत्र गटाची स्थापना केली. ५९ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र अध्यक्षांना सादर केल्यानंतर, विधानसभा अध्यक्षांनी या गटाला मान्यता दिली. ऋतब्रता बॅनर्जी यांनी दावा केला आहे की, येत्या दोन दिवसांत आणखी दोन आमदार त्यांच्या गटात सामील होणार आहेत.
हेही वाचा
राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रातील ‘शिंदे पॅटर्न’ची चर्चा का?
पश्चिम बंगालमधील या राजकीय भूकंपाची तुलना आता महाराष्ट्रातील ‘शिंदे पॅटर्न’शी केली जात आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘बाळासाहेब ठाकरे हेच आमचे नेते’ अशी भूमिका घेतली होती; अगदी तसाच पॅटर्न बंगालमध्ये पाहायला मिळत आहे. ऋतब्रता बॅनर्जी यांनी बंडखोरी करूनही, “ममता बॅनर्जी या आजही आमच्याच नेत्या आणि मार्गदर्शक आहेत,” असे म्हटले आहे. मात्र, पक्ष चालवण्याच्या पद्धतीवरून त्यांनी ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात थेट युद्ध पुकारले आहे. “निकालानंतरच्या बैठकीत आम्हाला अभिषेक बॅनर्जी यांच्या कामगिरीसाठी उभे राहून वंदन करण्यास सांगण्यात आले, जे आम्हाला मान्य नाही,” अशी आक्रमक टीका बॅनर्जी यांनी केली आहे.
कोण आहेत ऋतब्रता बॅनर्जी?
ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला सुरुंग लावणारे ऋतब्रता बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील अभ्यासू आणि आक्रमक नेते मानले जातात. त्यांनी आपल्या विद्यार्थी चळवळीची सुरुवात डाव्या विचारसरणीच्या ‘एसएफआय’ (SFI) संघटनेतून केली होती. त्यानंतर ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) राज्यसभेचे खासदार होते आणि २०१४ व २०२४ मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले होते. पुढे २०२० मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षाच्या कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत ते उलुबेरिया-पूर्वा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले असून आता टीएमसीच्या ५९ बंडखोर आमदारांचे नेतृत्व करत आहेत.
जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावणार
विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर ऋतब्रता बॅनर्जी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही सभागृहात सरकारच्या चुकीच्या धोरणांना अत्यंत आक्रमकपणे विरोध करू आणि तृणमूल काँग्रेसच्या मतदारांच्या व जनतेच्या हक्कांसाठी एका जबाबदार आणि खंबीर विरोधी पक्षाची भूमिका निभावू,” असे बॅनर्जी यांनी सांगितले. दरम्यान, या मोठ्या बंडखोरीनंतर आता ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी सरकार आणि पक्ष वाचवण्यासाठी काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.





