‘समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू झाला की म्हणतात देवेंद्रवासी झाला’; शरद पवारांचा टोला
![Sharad Pawar said that when there is an accidental death on the Samriddhi Highway, it is said that it has become a Devendravasi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Sharad-Pawar-780x470.jpg)
मुंबई : बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला. यात २५ जणांचा मृत्यू झाला. अपघातस्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदतही जाहीर केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
शरद पवार म्हणाले की, समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे. २५ लोकांचा बळी जाणं ही बाब वेदना देणारी आहे. कदाचित शास्त्रीय दृष्ट्या नियोजन केलेलं नसावं. त्याचा दुष्परिणाम असा आहे लोक मृत्यू होत आहेत. आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला. हा महामार्ग करण्याच्या काळात, नियोजन आखण्यात ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांना लोक दोषी ठरवतात.
हेही वाचा – ‘गदर २’ च्या निर्मात्यांवर अभिनेत्री अमीषा पटेलचा गंभीर आरोप; म्हणाली..
जी घटना घडली ती अत्यंत दु:खद आहे. २५ माणसं गेली ही बाब अत्यंत दु:खद आहे. आम्ही एकच गोष्ट ऐकतोय. अपघात झाला राज्य सरकारने पाच लाख रूपये दिले. पाच लाख रूपये मोजून हे प्रश्न सुटणार नाही. यासंदर्भात या देशात रस्ते-त्यांचं नियोजन यांचं ज्ञान असणारे कर्तबगार लोक आहेत त्यांची टीम तयार करावी. कुठे चूक झाली आहे कशामुळे चूक झाली आहे ते तपासलं गेलं पाहिजे. अपघातांची स्थिती, वाढते अपघात हे थांबतील कसे हे बघायला हवं. पाच लाख रूपये जाहीर करून प्रश्न सुटणार नाहीत. जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
मी काही किलोमीटर या रस्त्यावर प्रवास केला आहे. रस्ता म्हटलं की काही खुणा डोक्यात असतात की इथे झाड आहे, काही ठिकाणी वळण आहे. मात्र हा सलग सरळ रस्ता आहे. वाहन चालवणाऱ्यावर याचा काही परिणाम होतो का? अशी काही शंका लोकांनी बोलून दाखवली आहे. मात्र मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण कुठे त्रुटी राहिल्या आहेत ते पाहिलं गेलं पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले.