‘विधानसभेआधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली’; शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मतपत्रिका आणि मतदार यादीतील अनियमितता उघडकीस आणली आहे. यामुळे देशभरात मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून जनतेच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज नागपुरात केली. दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शरद पवार म्हणाले, की आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. मात्र, आजही मला आठवतंय की विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्याआधी दिल्लीत मला दोन व्यक्ती भेटण्यासाठी आले होते. त्या दोन व्यक्तींनी मला सांगितलं होतं की, महाराष्ट्रामध्ये २८८ विधानसभेच्या जागा आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. त्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे त्या लोकांनी जरी गॅरंटीचं सांगितलं तरी निवडणूक आयोगाबाबत माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती. पण अशा प्रकारचे लोक भेटत असतात, त्यामुळे मी त्या दोन लोकांकडे दूर्लक्ष केलं. त्या लोकांची मी राहुल गांधी यांच्याबरोबर भेट घालून दिली. त्यानंतर त्या लोकांना जे काही बोलायचं होतं, ते राहुल गांधींना बोलले. मात्र, राहुल गांधी आणि माझं मत असं होतं की याबाबतीत आपण लक्ष देऊ नये. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांचा पाठिंबा कशा पद्धतीने मिळेल याचा आम्ही निर्णय घेतला.
हेही वाचा : जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत २ जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा
दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी देखील उपस्थित होतो. पहिल्यांदा हे सांगायचं आहे की मी कालपासून पाहत आहे की, दिल्लीत उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे कुठे बसले होते? यावरून राजकारण सुरू आहे. राहुल गांधी यांनी जे प्रेजेंटेशन केलं, आता प्रेजेंटेशन पाहायचं म्हटलं की आपण पहिल्या रांगेत कधी बसत नाही. जसं आपण एखादा चित्रपट पाहायला गेलं तर पहिल्या रांगेत बसत नाहीत, आपण पाठिमागे बसतो. त्याच पद्धतीने मी स्वत: देखील शेवटी बसलो होतो. सांगण्याचं तापत्पर्य एवढंच आहे की स्क्रिनच्या जवळ आपण बसत नाहीत, अंतर सोडून बसतो. मात्र, उद्धव ठाकरे कुठे बसले? याचं दुर्देवाने राजकारण करण्यात येत आहे, असं शरद पवार म्हणाले.
राहुल गांधी यांनी अतिशय कष्ट करून मतदान प्रक्रियेतील अनियमिततेबाबतची माहिती सांगितली. एका ठिकाणी एक व्यक्ती राहते. पण त्याच ठिकाणाहून ४० लोकांनी मतदान केलं आहे. अशा प्रकारचे उदाहरणे राहुल गांधींनी दिले. राहुल गांधींनी फक्त उदाहरणे दिली नाहीत तर त्या आरोपांना आधार देखील दाखवला. मात्र, राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने एक शपथपत्र द्यावं असं म्हटलं. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. राहुल गांधींनी सांगितलं की मी संसदेत शपथ घेतलेली आहे, त्यामुळे वेगळ्या शपथपत्राची गरज नाही. मात्र, तरीही निवडणूक आयोग अशा प्रकारचा आग्रह करत असेल तर हे योग्य नाही. मात्र, राहुल गांधींनी केलेल्या आरोपांबाबत खोलवर जाण्याची गरज आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध आणि पानी का पानी झालं पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की आक्षेप निवडणूक आयोगाबाबत घेतला, मग भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर देण्यासाठी पुढे येण्याची गरज काय? आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं, भाजपाकडून नाही, असंही शरद पवार म्हणाले.




