‘२ महिन्यांनी जेव्हा जाग येईल तेव्हा राज ठाकरे बोलतात’; शरद पवारांचा पलटवार

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आषाढी एकादशीनिमित्त एक पोस्ट करून सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाराषट्रात गेल्या दशकभरात जे जातीपातीचं विष पसरलंय ते समूळ नष्ट होऊ दे अशी प्रार्थना केली. दरम्यान, राज ठाकरे यांची ही टिप्पणी शरद पवारांकडे रोख करणारी असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. यावरून शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी आजच असं वक्तव्य केलेलं नाही. ते नेहमीच असं बोलत असतात. ते त्यांचं वैशिष्ट्यच आहे. ते ८-१० दिवसांनी, महिन्याने, दोन महिन्यांनी कधी जागे झाले तर असं बोलतात. साधारणत: ज्याच्यावर टिप्पणी केली की लोक दखल घेतात त्यांच्यावर राज ठाकरे बोलतात, टिप्पणी करतात.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुरला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. ‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या… त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं.
हेही वाचा – प्रतीक्षा संपली! शिवरायांची वाघनखं उद्या महाराष्ट्रात येणार
देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो. परंतु, दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो.
अगदी ७, ८ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही. म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.





