Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

शिराळा मतदार संघात शिवाजीराव नाईक समर्थक महायुतीचे सत्यजित देशमुख यांच्या प्रचारात!

मिशन विधानसभा : आजी-माजी आमदारांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन होईना..!

शिराळा: शिराळा विधानसभा निवडणुकीत गेल्या पाच वेळेस एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले दोन आजी माजी आमदार नाईक हे यंदाच्या निवडणुकीत एक झाले आहे. माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांना आपला उघड पाठिंबा जाहीर केला आहे. कार्यकर्त्यांनी देखील प्रामाणिक काम करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र शिवाजीराव नाईक यांच्या आवाहनानंतरही कार्यकर्त्यांच्या भावना दुखावलेल्याच दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिस्पर्धी असलेले कार्यकर्ते एकत्र येताना अडचणी येत आहेत. अनेकांची दुखावलेली मने जुळताना दिसत नाहीत. पर्यायाने शिवाजीराव नाईक यांचे काही समर्थक भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारात आघाडीवर दिसत असल्याची स्थिती आहे.

शिराळा विधानसभेत राजकीय चुरस वाढत आहेत. राज्यासह देशातील बडे नेते उमेदवारांच्या प्रचारासाठी दाखल होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही समर्थक जोरदार प्रचाराला लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून आमदार मानसिंगराव नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांना माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी साथ दिली आहे. तर वाळवा तालुक्यातील ४८ गावातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील समर्थक देखील मदत करत आहेत.

असे असले तरी, काही समर्थक मनापासून काम करणार नाहीत, अशा चर्चा रंगत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आजी माजी आमदार नाईक समर्थक एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. राजकीय स्पर्धा असल्याने एकमेकांना पाण्यात पाहायचे काम कार्यकर्त्यांकडून झाले आहे. परिणामी यंदाच्या निवडणुकीत नेत्यांनी आवाहन करूनही कार्यकर्ते एकत्र येताना दिसत नाहीत. त्यामुळे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे काही समर्थक सत्यजित देशमुख यांच्या प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसते. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांच्या समर्थकांचे गावागावात गट आहेत. त्यांचेही फारसे जुळताना दिसत नाही. याबाबत काही प्रातिनिधिक समर्थकांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी सुसंकृत, अभ्यासू नेते असल्याने सत्यजित देशमुख यांना पाठिंबा देत असल्याची भूमिका उघड केली. या मध्ये काही कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा अपवाद देखील असू शकतो.

शिवाजीराव नाईक समर्थक सुखदेव पाटील म्हणतात…

माजी आमदार शिवाजीराव नाईक समर्थक सुखदेव पाटील म्हणाले की, आम्ही शिवाजीराव नाईक साहेबांचे समर्थक आहोत. त्यांचे नेतृत्व मानून काम करतो. ते ज्या वेळी राजकीय मैदानात स्वतः असतील, त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू. मात्र यंदाच्या निवडणुकीत आम्ही भाजप उमेदवार सत्यजित देशमुख यांना समर्थन देणार आहोत. देशमुखांची आणि आमची वैचारिक बैठक पटते. ते अभ्यासू आणि सुसंस्कृत राजकारणी आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विद्यमान आमदारांविषयी आमची काही तक्रार नाही. त्यांच्याविषयी आमचे वैयक्तिक कोणतेच भांडण नसल्याचेही पाटील यांनी नमूद केले.

ऐतवडे खुर्द येथील प्रताप पाटील म्हणतात…

ऐतवडे खुर्द येथील प्रताप पाटील म्हणाले की, यंदा आम्ही उघडपणे सत्यजित देशमुख यांचा प्रचार करत आहे. ते अभ्यासू नेते आहेत. त्यांचा मतदारसंघाच्या विकासात मोठा फायदा होईल. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी गावोगावी सभेतून आवाहन करत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांना प्रत्यक्ष भेटून आम्ही आमची भूमिका सांगितली आहे, असे पाटील म्हणाले. या दोन प्रतिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला माजी आमदार शिवाजीराव नाईक, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे अनेक समर्थक आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारात आघाडीवर असल्याचीही वस्तुस्थिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button