महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार? शिंदे गटातील नेत्याचं विधान चर्चेत

मुंबई | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी दिले. तसेच शिवसेना शिंदे गटाची लोकसभा उमेदवारांची यादी सोमवारपर्यंत जाहिर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवारांच्या भेटीला अनेकजण जात आहेत. महादेव जानकरदेखील जातील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, येत्या दोन दिवसांत आमच्याकडे (शिवसेना शिंदे गटाकडे) येणाऱ्यांची संख्या जर पाहिली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. येत्या सोमवारी मोठे भूकंप पाहायला मिळतील, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – उन्हाळ्यात काळे कपडे का घालू नयेत? काय आहे यामागचे कारण?
‘एमआयएम’ महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा लढवण्याची शक्यता आहे. यावर संजय शिरसाट म्हणाले, प्रत्येक उमेदवार आपल्या शैलीत प्रचार करत असतो. पण यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’ नावालादेखील उरणार नाही, एवढे निश्चित आहे.
महाविकास आघाडीने ‘वंचित’साठी चार जागा देण्याचे मान्य केले. यावरून संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले, आज महाविकास आघाडीची बैठक होत आहे. मात्र, या बैठकीला अॅड. प्रकाश आंबेडकर यांना बोलवले नाही, म्हणजे महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायची नाही, हे स्पष्ट होत आहे. या आघाडीची सुरूवातच बिघाडीची आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.





