‘एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत’; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

मुंबई | महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही अद्याप सत्तास्थापनेला मुहूर्त लाभलेला नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातच, एकनाथ शिंदे यांनी दोन पावले मागे येऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे किंवा केंद्रात मंत्रीपद घ्यावे, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. यावरून शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे.
संजय शिरसाट म्हणाले, की एकनाथ शिंदेंमुळे महायुतीला प्रचंड असा विजय मिळाला. त्यामुळे तेच मुख्यमंत्रीपदावर राहिले पाहीजेत, अशी आमची मागणी आहे. पण जर त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जात असेल तर ते स्वीकारणार नाहीत. जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविले तर त्याचा योग्य संदेश राज्यात जाईल आणि आगामी स्थानिक स्वराज संस्था, महानगरपालिकाच्या निवडणुकीत त्याचा खूप फायदा होईल.
हेही वाचा – ‘गौतम अदाणींना अटक करा’; राहुल गांधींची मागणी
रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले होते. त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. हा आकडा खूपच चांगला आहे. पण भाजपाचे १३२ आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपा पक्षाने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तसेच भाजपा पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांनी एकतर उपमुख्यमंत्रीपद घ्यावे किंवा त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचे नसेल तर त्यांनी केंद्रात येऊन मंत्रीपद घ्यावे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह नक्कीच त्यांचा विचार करतील. पण त्यांनी नाराजी दूर करून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहीजे, असं रामदास आठवले म्हणाले.





