“फुटलेल्या ६ बंडखोरांमध्ये मंत्रिपदावरून वाद”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई | शिवसेना (UBT) पक्षात झालेल्या ताज्या फुटीवरून खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पक्षातून बाहेर पडलेल्या ६ खासदारांमध्ये मंत्रिपदावरून तीव्र वाद सुरू होता. अखेर एकाला मंत्रिपद आणि उर्वरित ५ जणांना भरपाई म्हणून प्रत्येकी २५ कोटी रुपये देण्याची ‘मांडवली’ (तडजोड) रात्रीच्या सुमारास झाली आहे,” असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.
खासदार संजय राऊत म्हणाले, की मी शिवसेनेत ही फूट झाली असं मानत नाही. माणूस विचारांशी बांधीलकी दाखवून फुटतो. एखाद्यानं स्वत:ला बाजारात विकण्यासाठी उभं केलंय आणि कुणी खरेदी केलं तर त्याला फुटणं म्हणत नाही. त्याला विकणं म्हणतात. तसे आमचे ६ लोक दोन दिवसांपूर्वी बाजारात उभे राहिले. त्यांनी स्वत:ची बोली लावली आणि त्या बोलीवर त्यांना विकत घेतलं गेलं. कोणताही महान विचार घेऊन ते फुटलेले नाहीत.
यावेळी बोलताना संजय राऊतांनी भाजपाच्या एका वरीष्ठ नेत्याचा उल्लेख ‘जामनेनची मावशी’ असा केल्यानंतर त्यावरून चर्चा चालू झाली आहे. जळगावच्या जामनेरच्या मावशीबाई सांगत होत्या की काँग्रेसच्या मांडीवर शिवसेना बसल्यामुळे हे ६ लोक सोडून गेले. तमाशातली मावशी असते अशा भाजपातल्या सगळ्या मावश्या आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष आहे. त्या काँग्रेसच्या मदतीवर हे ६ लोक निवडून आले. तेव्हा तुम्हाला माहीत नव्हतं का की मविआमध्ये काँग्रेस आहे ते? जामनेरच्या या मावशीबाईला काँग्रेसचा एवढा तिटकारा का? काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. तुम्ही काय केलं? भाजपात असा क्रांतिकारक आहे का ज्यानं देशासाठी प्राणांचं बलिदान दिलं? असा प्रश्न राऊतांनी भाजपाला केला आहे.
हेही वाचा
कचरा नियमांची सक्ती आणि सोसायट्यांवरील दंडात्मक कारवाई तुर्तास रोखा! : आमदार शंकर जगताप
काय तर म्हणे बंड केलं. कसलं बंड? बंड आणि क्रांतीला बदनाम करू नका. भाजपानं स्वातंत्र्याच्या काळात कोणतेही बंड किंवा क्रांती केलेली नाही म्हणून त्यांना बंड आणि क्रांतीची व्याख्या माहिती नाही, असंही ते म्हणाले.
अजूनही हे ६ लोक मुंबईत नाहीयेत. त्यांच्यात मंत्रिपद कुणी घ्यायचं यावर वाद चालू आहेत. तोडगा असा निघालाय की एकालाच मंत्रीपद मिळेल आणि त्याची भरपाई म्हणून उरलेल्या ५ जणांना आणखीन २५ कोटी रुपये दिले जातील, पण त्यांनी गोंधळ घालू नये. रात्री त्यांची अशी मांडवली झाली आहे. त्यांच्याकडून तुम्ही बंडाची वा विचारांची काय अपेक्षा ठेवणार? त्यांच्या मतदारसंघात लोक प्रेतयात्रा काढतायत. हे बिळात लपून बसले आहेत. यांना पोलिसांचे बंदोबस्त लावले आहेत. तुम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही, मग तुम्हाला पोलीस ताफा कशासाठी हवाय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
अर्धा तास फक्त ईडी, सीबीआय मिळू द्या. भाजपाचे महाराष्ट्रात ७ तुकडे होतील. सगळ्यात आधी पक्ष सोडणाऱ्यांमध्ये गिरीश महाजन असतील इतक्या त्यांच्या भानगडी आहेत”, असा दावा संजय राऊतांनी केला. तसेच, “तुम्हाला लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या. आमच्या पक्षाच्या चिन्हावर हे निवडून आले. त्यासाठी उद्धव ठाकरे, पक्ष कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं आहे. ज्यांनी आई-बापाच्या, साईबाबांच्या आणि आई भवानीच्या खोट्या शपथा घेतल्या, त्यांनी राजीनामे द्यावेत आणि उघडपणे जनतेला सामोरं जावं, असंही संजय राऊत म्हणाले.





