‘आम्ही नातं जोडायला तयार’; मनसे-शिवसेना युतीवर संजय राऊतांचं मोठं विधान

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. या दोन्ही पक्षांचे प्रमुख, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, हे चुलत भाऊ असल्याने या युतीकडे मराठी माणसाचे विशेष लक्ष लागले आहे. दोन्ही नेत्यांची विधाने आणि राजकीय हालचाली नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशातच शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी या युतीसंदर्भात मोठे विधान करत राजकीय वातावरणात खळबळ उडवून दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की आम्ही युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुलाखतीमध्ये कोणता नेता काय बोलतो? यावरून युतीची चर्चा ठरत नाही. उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्ष राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाबरोबर नातं जोडायला सकारात्मक भूमिका ठेवली आहे. मराठी माणसाचे अहित होता कामा नये, ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे. मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना, इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण मागे हटता कामा नये.
हेही वाचा : शिवसेनेच्या आंदोलनात पिंपरी चिंचवडच्या लेकींची मृत वैष्णवीला अनोखी श्रद्धांजली!
मराठी माणसाचा दोन्ही नेत्यांवर (ठाकरे बंधू) भावनिक आणि राजकीय दबाव आहे. मराठी माणसाला मुंबईवर आपला हक्क कायम ठेवायचा असेल आणि सूरत या ईस्ट इंडिय कंपनीच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावे लागेल. मराठी माणसाला ताठ मानेने जगायचे असेल तर सर्व जळमटे दूर ठेवून, मतभेद विसरून एकत्र यावे लागेल. ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे मन अतिशय मोठं आणि विशाल आहे. आमची यासंदर्भात कालही चर्चा झाली असून आपण सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही. किंबहुना हीच बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल, असंही संजय राऊत म्हणाले.