‘सरकारच्या दबावामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा’; ठाकरे गटाचा गंभीर आरोप
![Sanjay Raut said that the resignation of the Chairman of Backward Classes Commission was due to the pressure of the government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Uddhav-Thackeray-3-780x470.jpg)
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजीनामा देताना निरगुडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, निरगुडे यांच्या राजीनाम्यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीी यावरून प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोग आणि त्याचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्यावर राज्य सरकारचा दबाव होता. त्यामुळे आधी आयोगातील सदस्यांनी राजीनामे दिले आणि आता अध्यक्षांनीदेखील राजीनामा दिला आहे. आनंद निरगुडे यांनी राजीनामा देऊन आठ दिवस उलटले तरी सरकारने ही गोष्ट जाहीर केली नव्हती. यात सरकारकडून कसली लपवाछपवी चालू आहे ते पाहावं लागेल. विशिष्ट प्रकारचा अहवाल देण्यासाठी मागासवर्ग आयोगावर सरकारचा दबाव होता. त्यामुळेच आयोगातील सदस्यांसह अध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत.
हेही वाचा – सावधान! मासिक पाळीत ‘ही’ पेनकिलर खाताय? होऊ शकतो दुष्परिणाम
मागासवर्ग आयोगातील सदस्यांचे आरोप काय?
राज्य मागासवर्ग आयोग हा मागासवर्गातील जातीची माहिती गोळा करण्यासाठी आहे. राज्य मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आहे. आयोग हा स्वायत्त आहे पण माहिती देण्यासाठी आयोगावर सरकारकडून दबाव टाकण्यात आल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणातून आलेली माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो, परंतु सरकारला अपेक्षीत माहिती देणे आम्हाला शक्य नाही. जी माहिती आमच्याकडे आहे तीच माहिती पुरवू शकतो, असे आयोगाच्या सदस्यांचे म्हणणे होते.