‘१६ आमदारांची राजकीय तिरडी बांधली फक्त हे राम म्हणायचं बाकी’; संजय राऊतांचा हल्लाबोल
![Sanjay Raut said that the political party of 16 MLAs is tied, only to say Ram](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Sanjay-Raut-2-780x470.jpg)
मुंबई : शिवसेनेच्या फुटीर १६ आमदारांचा निकाल येत्या दोन आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना या आमदारांबाबत निर्णय घेण्याची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे आणि त्यांचे १६ आमदार अपात्र ठरतील. त्याबाबत कुणाच्या मनात शंका असण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची राजकीय तिरडी बांधली आहे. फक्त हे राम म्हणायचं बाकी आहे. हे स्पष्ट सांगतो. मुडद्यात कितीही जान फुंकण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी विज्ञान आणि कायद्याला मर्यादा आहे.
हेही वाचा – सोन्याच्या पावलांनी आली गौराई! आज ज्येष्ठ गौरी आवाहन, मुहूर्त जाणून घ्या
विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. नाही तर संसदीय इतिहासात विधानसभा अध्यक्षांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे त्यांनाही माहीत आहे. राज्यातील सरकार फसवणुकीतून तयार झालं आहे. पैसे मिळाले असतील पण इतर आश्वासने पूर्ण झाली नाही. दोन्ही पक्षातील १०० टक्के आमदार ईडी, सीबीआय, भीती आणि पैसे या मोहापायी आणि भीतीतून पळाले आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.