‘नवं संसद भवन म्हणजे पंतप्रधान मोदींचं मल्टिप्लेक्स’; संजय राऊतांची टीका
![Sanjay Raut said that the new Parliament House is Prime Minister Modi's multiplex](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Sanjay-Raut-3-780x470.jpg)
मुंबई : नव्या संसद भवनात नुकतेच पहिलं विशेष अधिवेशन पार पडलं आहे. दरम्यान, नवीन संसद भवनावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. जुनं संसद भवन मजबूत आणि त्याला काहीच धोका नसताना नवं संसद भवन उभारण्याची गरज काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, जुनं संसद भवन अजूनही ५० ते १०० वर्ष टिकून राहू शकते एवढं मजबूत आहे. तरीही नवीन संसद उभारण्यात आल्याने दिल्लीत त्याबाबत दिल्लीत मजेदार चर्चा सुरू आहेत. काही चर्चा मनोरंजक आहेत. दिल्लीचे सरकार हे अंधश्रद्धा आणि अंधभक्तांच्या वर्तुळात फिरत आहे. सरकार चालवणाऱ्यांवर अंधश्रद्धा, ग्रह आणि कुंडलीचा पगडा आहे.
हेही वाचा – IND vs AUS : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल!
एका ज्योतिषाने भाजपला सल्ला दिला. त्यानंतर नवं संसद भवन उभं राहिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. सध्याच्या संसद भवनात दहा वर्षापेक्षा अधिक काळ कोणीही टिकत नाही. त्यामुळे सध्याचे संसद भवन तुम्हाला धार्जिणे नाही. त्यामुळे नव्या संसदेची निर्मिती करा, असा सल्ला ज्योतिषांनी दिला. त्यामुळे घाईघाईत नवे संसद उभारण्यात आले. शिवाय २०२४ च्या आधीच हे संसद भवन उभारण्यात आले. नवं संसद भवन गायमुखी असावं असा ज्योतिषाचा आग्रह होता, तोही मानण्यात आला, असा गौप्यस्फोटच राऊत यांनी केला आहे. एकीकडे चंद्रावर जायचं आणि दुसरीकडे अंधश्रद्धेला बळी पडून राज्यकर्ते संसदेची निर्मिती करतात हे देशाला शोभणारं नाही, असं संजय राऊत म्हणाले.
नव्या संसद भवनावर दिल्लीतील ज्योतिषाचार्य आणि बाबाबुवांची चलती आहे. त्यांची छाया या संसदेवर पडली आहे, अशी चर्चा दिल्लीत सुरू आहे. नवं संसद हे भाजपचं प्रचार केंद्रच बनलं आहे. प्रेक्षकगृहातून ज्या पद्धतीने मोदी जिंदाबादचे नारे दिले जात होते, ते यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. संसदेला एक प्रतिष्ठा होती, ती कायम होती, असंही संजय राऊत म्हणाले.