‘रिमोट वोटिंग म्हणजे रिमोट भ्रष्टाचार’ संजय राऊतांचं ईव्हीएम निवडणुकांवरून मोठं विधान
देशातील निवडणूक प्रक्रियेवर लोकांना संशय आहे
![Sanjay Raut said that remote voting means remote corruption](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/sanjay-raut-780x470.jpg)
मुंबई : लोकसभा, विधानसभासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी विरोधीपक्षाकडून सातत्याने केली जात आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील ईव्हीएम निवडणुकांवरून मोठं विधान केलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, देशाची लोकशाही टिकवायची असेल, तर कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएमला विरोध झाला पाहिजे आणि निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या पाहिजे. या देशातील निवडणूक प्रक्रियेवर लोकांना संशय आहे. आपला शेजारी देश बांगलादेश आहे. ईव्हीएमवर निवडणुका होणारा बांग्लादेश भारतानंतर शेवटचा देश होता. त्या बांग्लादेशच्या प्रमुख शेख हसिना यांनी ईव्हीएम निवडणुका रद्द करून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची घोषणा केली.
विरोधकांना ईव्हीएम लोकशाहीसाठी मारक आहे असं वाटतं. त्यामुळे शेख हसिना यांनी बाग्लादेशच्या निवडणुका ईव्हीएमवर होऊ नये, असं मत मांडलं. तसेच ईव्हीएम रद्द केलं आणि मतपत्रिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला, असं संजय राऊत म्हणाले.
रिमोट वोटिंग म्हणजे रिमोट भ्रष्टाचार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी हा रिमोट भ्रष्टाचार केला जात आहे. ते हाताने मशिन हॅक करतील. ते कागदावर का करत नाहीत. आजही माझा कागदावर विश्वास आहे. मी कुणाला शिक्का मारतोय हे मला दिसलं पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.