‘आठवलेंचा पक्ष हाच खरा आंबेडकरवादी पक्ष म्हणालो तर’; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर संजय राऊतांचं उत्तर

मुंबई | खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्या या विधानानंतर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या या विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, जर आम्ही असं म्हणालो की रामदास आठवले यांचा पक्ष खरा आंबेडकरवादी पक्ष आहे, तर प्रकाश आंबेडकर यांच्या मनाला किती यातना होतील? पण आम्हाला त्यांच्या विधानाने यातना होत नाहीत. आम्ही असं म्हणतो की प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत. त्यांनी तो वारसा पुढे चालवावा. जर प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल की एकनाथ शिंदे यांचा पक्ष खरी शिवसेना आहे तर त्यांना कायद्याचा आणि लोकभावनेचा अभ्यास करावा लागेल.
हेही वाचा – आज श्रावणातील पहिले मंगळागौरी पूजन; जाणून घ्या महत्त्व आणि मुहूर्त..
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. शिवसेनेची पारंपरिक मतं एकनाथ शिंदेंबरोबर आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मतदारांनी एकनाथ शिंदेंवर विश्वास दाखवला. शिवसैनिक एकनाथ शिंदेंनाच खरे शिवसेनाप्रमुख मानू लागले आहेत. तसेच शिवसेनेची मतं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट वाढल्याचं आपण पाहत आहोत. मात्र आरक्षणवादी लोक आणि मुस्लिमांमुळे उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट वाढला आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.





