राज ठाकरे यांना काँग्रेससोबत जायची इच्छा? संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय भुवया उंचावल्या

मुंबई | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळेल का? यावर तर्कवितर्क लढवले जात असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठे आणि महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची स्वतःची अशी इच्छा आहे की महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसलाही सोबत घेणे गरजेचे आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “स्वतः राज ठाकरे यांची ही भूमिका आहे की, महाराष्ट्रात काँग्रेस हा एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होणे गरजेचे आहे. ही केवळ त्यांचीच नव्हे, तर सर्वांचीच भूमिका आहे.”
हेही वाचा : दिघी गावठाण परिसरातील नागरिकांना वीज संकटातून दिलासा!
मात्र हे त्यांचे मत असले तरी तो अंतिम निर्णय नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही, असे म्हटले होते. तसेच मनसेला आघाडीत घ्यायचे असल्यास तो निर्णय दिल्लीतून होईल असेही त्यांनी नमूद केले होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत यांनी ‘त्यांचे म्हणणे बरोबर आहे’ असे सांगत मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशावर दिल्लीत चर्चा सुरू असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.
राऊत यांनी काल काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी चर्चा झाली असून ते लवकरच राहुल गांधी यांच्याशीही चर्चा करतील असे स्पष्ट केले. तसेच उद्धव ठाकरे हे देखील मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहेत. मात्र उद्याचे शिष्टमंडळ हे केवळ एका पक्षाचे नसून सर्वपक्षीय आहे हे हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्षात घ्यावे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा उघड झाल्याने महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता दिसत आहे.




