Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत’; संजय राऊत

मुंबई | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. मात्र अद्याप जागावाटप जाहीर झालेलं नाही. याबाबत प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला एक सल्ला दिला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा वेगाने व्हावी आणि तातडीने निर्णयापर्यंत येण्याची गरज आहे. मला कारणांमध्ये पडायचं नाही पण नक्कीच २०० पेक्षा जास्त जागांवर आमची सहमती आहे. उरलेल्या जागांचा पेच निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात माझी आज उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. कुणाच्या काय भूमिका आहेत हे त्यांना सांगितलं आहे. आज सकाळी मी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसचे रमेश चेन्नीथेला यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधींशीही मी चर्चा करणार आहे. काही जागांवर गाडी अडली आहे त्यातून ब्रेक निघाला पाहिजे. ही आमची भूमिका आहे.

हेही वाचा    –      ‘शरद पवारांनी राज्याला विकासापासून दूर ठेवले’; उदयनराजेंची टीका 

महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सगळ्यांना पक्ष चालवायचे आहेत आणि टिकवायचे आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन जास्त खेचाखेची बरी नाही हे आम्हालाही माहीत आहे. निर्णय लवकर झाले पाहिजेत कारण भाजपाचा आम्हाला पराभव करायचा आहे. भाजपाशी कसं लढायचं हे आम्हाला माहीत आहे. महाराष्ट्रात भाजपा, अमित शाह आणि मिंधे गटाने सर्वात जास्त त्रास शिवसेनेला दिला आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले. त्यामुळे आम्हाला माहीत आहे की टार्गेटवर कोण आहे. या सगळ्या भाजपाच्या बिश्नोई गँग आहेत. आम्ही सगळा त्रास सहन करुन आम्ही उभे आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसची एक यंत्रणा आहे, त्यांना यादी दिल्लीला पाठवावी लागते. आमचं असं म्हणणं आहे की हे निर्णय महाराष्ट्रात झाले तर फार वेगाने होतील. शिवसेना, राष्ट्रवादी यांचे पक्ष महाराष्ट्रात आहेत. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना आम्ही विनंती केली आहे की तातडीने निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असं दिसतं आहे.तसंच आम्ही हे सांगू इच्छितो, विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे ते काही स्वतंत्र संस्थान नाही. रामटेकसारखी सहावेळा निवडून आलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली. अमरावतीची जागा काँग्रेसला दिली. आम्ही आता अपेक्षा ठेवल्या तर चुकीची आहे असं वाटत नाही.आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की विधानसभेच्या जास्त जागा मिळाव्यात. जे रामटेकच्या बाबतीत आहे तेच अमरावतीच्या बाबतीत आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button