‘भाजपाने अजितदादांना न विचारता भुजबळांना मंत्री केलं’; ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी २० मे रोजी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांनी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना संधी देण्यात आली. यामुळे महायुती सरकारने भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की अजित पवार यांचा भाजपाबरोबर अपमान सुरू आहे, म्हणजे अजित पवार यांना न विचारता त्यांच्याच पक्षातील (राष्ट्रवादी काँग्रेस) नेते छगन भुजबळ यांना भारतीय जनता पक्षाने मंत्री केलं. त्यामुळे अजित पवार यांना झोप देखील लागत नसेल. अजित पवार ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्या पक्षाच्या एका नेत्याला (छगन भुजबळ यांना) मंत्री करण्याचे आदेश दिल्लीतून येतात. मग अशावेळी काय करायचं? उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांबाबत देखील दिल्लीतून आदेश येतील, काही लोक त्या प्रयत्नात देखील आहेत.
हेही वाचा : रहाटणीत पावसामुळे उदभवलेल्या समस्यांची माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्याकडून पाहणी
शरद पवारांच्या पक्षातील काही नेते भाजपाबरोबर जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये रंगत आहे. त्यावर राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली. सत्तेची तहान लागली असली तरी कोणी गटारातलं पाणी प्यायचं नसतं असा सल्ला राऊत यांनी खासदार सुळे यांना दिला आहे.
तुम्ही प्रसारमाध्यमं सुप्रिया सुळे यांचं व अन्य काही नेत्यांची नावं घेत आहात. त्यांना नक्कीच सत्तेची तहान लागली असेल. पण तहान लागल्यावर कोणी गटारातलं किंवा गढूळ पाणी पित नाही. त्यांना सगळ्यांना नक्कीच सत्तेची तहान लागली असेल. परंतु, नेमक्या कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायची म्हटलं तरी लाटांचा सामना करावा लागणार आहे. महासागरात इतक्या मोठ्या लाटा उसळल्या आहेत, तिथे बरीच गर्दी आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. तिकडे आधी गेलेले लोक आपल्या अस्तित्वासाठी धडपड करत आहेत. त्यात आता नवीन लोक तिथे जाऊन काय करणार आहेत? असं संजय राऊत म्हणाले.





