Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

संतोष देशमुख हत्या प्रकरणी संदीप क्षीरसागर विधानसभेत आक्रमक; वाल्मिक कराडचं नाव घेत म्हणाले..

नागपूर | विधीमंडळात बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरुन चर्चा सुरु आहे. यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. याप्रकरणाची चौकशी करुन वस्तुस्थिती समोर आली पाहिजे, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. बीडमध्ये गुंडगिरी कशामुळे वाढली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बीडमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावलं उचलावी लागतील, असेही संदीप क्षीरसागर म्हणाले.

संदीप क्षीरसागर म्हणाले, की संतोष देशमुखला गाडी अडवून जेव्हा उचलून नेलं, त्याचा सहकारी त्याच्यासोबत होता. तो सहकारी पोलीस स्थानकात वारंवार सांगत होता की सरपंचांना उचलून नेलं आहे आणि त्यांचा जीव धोक्यात आहे, तेव्हा पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. २-३ तासांनंतर म्हणजे त्या सरपंचाची हत्या झाल्यानंतरच पोलिसांनी हालचाल केली. अत्यंत क्रूरपणे सरपंचाची हत्या करण्यात आली आहे.

हेही वाचा     –      भेटी मागे दडलंय काय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांनी घेतली दिल्लीमध्ये भेट!

आरोपीचं नाव वाल्मिक कराड आहे. त्याचे मोबाईल रेकॉर्ड बघितले, तर पूर्ण प्रकरण उघड होईल. ६, ९ आणि ११ तारखेचे त्याचे सीडीआर रेकॉर्डवर आणावेत. जर वस्तुस्थिती खोटी असेल, तर तुम्ही आमच्यावरही कारवाई करा. वाल्मिक कराडमुळेच बीडमध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झालं आहे. कुठेही खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी लावलीच पाहिजे. पण त्याचबरोबर जोपर्यंत हे लोक अटक होणार नाहीत तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.

वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. पण तरी त्याला अटक झालेली नाही. ३०२ च्या गुन्ह्यातला मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यात याचं नाव आलं पाहिजे. अधिवेशन संपण्याआधी वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. हे लोक इतर सगळे गैरप्रकार करण्यात तरबेज आहेत. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅकवर निकाल लागायला हवा, असं आमदार क्षीरसागर म्हणाले.

बीडमध्ये दोन प्रकार चालू आहेत. एकतर गुन्हा खरा असूनही वेळेवर गुन्हा दाखल होत नाही. या प्रकरणात १२ तास उलटल्यानंतर लोक आंदोलनाला बसले, तेव्हा गुन्हा दाखल झाला. आणि दुसरं म्हणजे खोटे गुन्हे दाखल करणे. ३०७ चा गुन्हा आमच्या जिल्ह्यात चॉकलेट खाल्ल्यासारखा दाखल होतो. बीडमध्ये कुणावर काय होईल आणि कोण काय करेल याचा काही नेम राहिलेला नाही. त्या सरपंचाच्या गावात मी गेलो तेव्हा गावकरी म्हणाले न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस स्थानक पेटवून देऊ. वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये काय परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाही. लोक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. कायदा-सुव्यवस्था सांभाळणं अवघड होऊन जाईल, असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button