मनसेला मोठा धक्का! कसब्यात मनसेच्या ५० कार्यकर्त्यांचा राजीनामा

मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी होणार
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा दिला आहे.
मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांनी मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केल्याने मनसेकडून सात कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर आता कसबा विधानसभा मतदारसंघातील पन्नास मनसैनिकांनी राजीनामा दिला असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदागे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम यांची हकालपट्टी करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता चाळीस ते पन्नास कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे.





