‘महायुतीने आमचा विचार केला नाही’; रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

Ramdas Athawale and Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. महायुतीचं जागावाटप जवळपास झालं असून जवळपास बहुतेक जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरीत उमेदवारांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीतील नाराजीनाट्य आता समोर येऊ लागले आहे. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन (आठवले गट) पक्षाने नाराजी उघड केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा झाली. रिपब्लिकन लहान पक्ष असला तरीही जनता जनार्दनचा पाठिंबा आहे. आम्हाला १०-२० जागा नको होत्या. चार पाच जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही रिपब्लिकनच्या मतांचा फायदा होणार आहे. पण तरीही महायुतीच्या नेत्यांनी आमचा विचार केला नाही.
हेही वाचा – ‘सातत्याने मला संपवण्याचा प्रयत्न होतोय’; भरसभेत सुजय विखे पाटलांना अश्रू अनावर
आमची यादी त्यांना दिली होती. आम्ही त्याग केला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली विकास होत आहे, महाराष्ट्रातही चांगलं काम चाललंय. त्यामुळे महायुतीबरोबर राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. रिपब्लिकन पक्षाकडे मोठं समर्थन आहे. त्यामुळे फडणवीसांची भेट घेऊन मुंबईतील एक जागा देण्याची मागणी केली आहे. एक-दोन जागा मिळाव्यात याकरता आग्रहही केला आहे. त्यामध्ये धारावी किंवा चेंबूरच्या जागेवर मागणी केली आहे, असं रामदास आठवले म्हणाले.





