एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार; रामदास आठवलेंचं सूचक विधान

Eknath Shinde | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झाल्यानंतरही एकनाथ शिंदेंची सरकारमध्ये काय भूमिका असणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक सूचक विधान केलं आहे.
रामदास आठवले म्हणाले, की एकनाथ शिंदे यांना सन्मान मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि मी ती देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली आहे. त्यानंतर फडणवीस यांनी मला सांगितलं की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील. महायुतीत त्यांना योग्य सन्मान मिळेल आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नसतील तर त्यांना महायुतीचं अध्यक्षपद किंवा संयोजकपद द्यावं असंही मी सुचवलं आहे. शेवटी एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीला इतका मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे त्यांचा आदर राखणं आवश्यक आहे, ही भूमिका मी मांडली आहे. यासह मी आरपीआयसाठी एका मंत्रीपदाची मागणी केली आहे.
हेही वाचा – देवेंद्रजी, हम आपके साथ है। : आमदार शंकर जगताप
भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन. फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे. ते एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते उत्तम काम करतील. मी नुकतीच अमित शाह यांची भेट घेत होती. या भेटीत त्यांना सांगितले आहे की या निवडणुकीत महायुतीला दलितांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आरपीआयलाही स्थान मिळायला हवं. अमित शाह यांनी यावर विचार करतो असा शब्द दिला आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.