स्वातंत्र्यवीर सावरकरांना आधी भारतरत्न द्या! मनसेची मागणी

मुंबई : भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा काढण्यात येत आहे. आज ती यात्रा डोंबिवलीतून निघणार आहे. यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आधी भारतरत्न जाहीर करा आणि मगच गौरवयात्रा काढा. ते जाहीर न करता केवळ गौरवयात्रा काढून काय होणार? हिंदुत्वाची वातावरणनिर्मिती होईल. त्या पलीकडे काय? केंद्रात नऊ वर्षे भाजप सत्तेत आहे. त्यामुळे आधी सावरकर यांना भारतरत्न जाहीर करावे, मगच यात्रा काढावी, असं मनसे नेते राजू पाटील म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भाजप तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली. ही यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, असंही ते म्हणाले.





