‘मनोज जरांगेंच्या मागून कोण बोलतंय हे लवकरच कळेल’; राज ठाकरेंचं सूचक विधान
![Raj Thackeray said that we will soon know who is talking behind Manoj Jarang](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Manoj-Jarange-Patil-and-Raj-Thackeray-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. मात्र सरकारने दोन महिन्यांचा कालावधी दिला. यानंतर राज्यातल्या कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्यात आली. परंतु, त्यास राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागलं आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक सूचक विधान केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, मुळात आता कोणत्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही. हीच गोष्ट मी मनोज जरांगे यांना भेटलो तेव्हा त्यांनादेखील सांगून आलो होतो. मी आता काही वेगळं सांगत नाही. अशी कुठलीही गोष्ट होणार नाही (आरण मिळणार नाही). मनोज जरांगे पाटील यांच्या मागून कोणी आहे का? हे तपासावं लागेल. या आरक्षण प्रकरणामुळे जातीयवाद निर्माण करून महाराष्ट्र राज्यातील सुव्यवस्थेचा भंग करायचा असं कोणी ठरवलं आहे का? निवडणुका तोंडावर असताना अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. मला हे सगळं चित्र सरळ दिसत नाही.
हेही वाचा – हिवाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ‘हे’ १० उपाय नक्की करा
राज्यातील राजकीय परिस्थिती संभ्रमावस्थेतील आणि घाणेरडी झालेली आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांची भिती वाटायला हवी. परंतु राजकीय पक्ष उघडपणे मतदारांना मुर्ख समजतात. पाच वर्ष खड्डे, बेरोजगारी या विषयावर बोलायचे आणि शेवटी मतदान करताना वेगळ्याच मुद्द्यावर मतदान करायचे असे मतदारांनी केल्यास त्यांची किमंत काय राहणार, मतदार नुसता सुशिक्षित असून नाही तर सूज्ञ असावा लागतो, असंही राज ठाकरे म्हणाले.