शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळ्याचे स्ट्रक्चर ऑडिट करा :चंद्रकांत नखाते
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिले निवेदन
पिंपरी : नुकतेच मालवण येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या हद्दीतील महापुरुषांच्या पुतळ्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी मनपा आयुक्तांना केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नुकतेच मालवन येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत मानले जातात. महाराज म्हणजे महाराष्ट्राचा किंबहुना मराठी माणसाच्या अस्मितेशी जोडला गेलेला भावनिक मुद्दा आहे. ज्या कारागिराला पुतळा बनविण्याचे काम देण्यात आले होते. त्याचा एकुनच कामाचा अनुभव पाहता एवढा मोठा महाराजांचा पुतळा बनविण्याचे काम त्यांना दिलेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुतळा कोसळल्यामुळे महाराजांच्या पुतळ्याची विडंबना झाली आहे. समाजमाध्यमातून, प्रसिध्दी माध्यमातून टिकेची झोड उठली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोप-यातून आलेले विविध धर्मिय, विविध समाज बांधव वास्तव्य करत आहेत. त्यांच्या मागणीचा विचार करुन पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात महापुरुषांचे मोठमोठे पुतळे स्थापन केले आहेत. त्यामुळे शहराला पुतळ्यांचे शहर म्हणून देखील अभिमानाने ओळखले जाते. परंतु, या पुतळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. असंख्य ठिकाणी पुतळ्यांचे सुरक्षेसाठी त्याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमलेला नाही. पुतळ्यांची वेळेवर स्वच्छता देखील केली जात नाही. उद्या मालवन येथील पुतळ्याची पुनर्रावृत्ती शहरात घडली तर त्याला कोण जबाबदार, यामुळे वेळीच सावधानता बाळगून शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. जेणेकरुन भविष्यात पुतळा कोसळण्याची दुर्घटना टळू शकेल, असेही सदर निवेदनात म्हंटले आहे.





