Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘सरकारने वसूल केलेला टोल परत केला पाहिजे’; मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग कोंडीप्रकरणी राज ठाकरेंचा संताप

Raj Thackeray | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्याने निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. तब्बल ३२ तास महामार्ग ठप्प राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले असून या काळात वसूल केलेला टोल प्रवाशांना परत करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपलिन गॅस वाहून नेणारा टँकर उलटला. गॅस गळतीचा धोका लक्षात घेऊन वाहतूक पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे दोन्ही दिशांना मोठी वाहतूक कोंडी झाली. बुधवारी दुपारी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरून परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी जवळपास ३२ तास लागले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रसाशन घेतं का? हा प्रश्न आहे.

हेही वाचा    :              ‘अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १२ हेक्टर जागा मंजूर; ४३९ रुग्णशय्येचे अद्ययावत रुग्णालय उभे राहणार’; चंद्रशेखर बावनकुळे

मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? असाही सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच, असे राज ठाकरे म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button