‘महाराष्ट्राचं सोनं लुटलं जातंय आणि तुम्ही जाती-पातीत मश्गूल’; राज ठाकरे

Raj Thackeray Podcast | महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकीबाबत भाष्य केले. तसेच राज्यातील आर्थिक आणि राजकीय विषयांवर भाष्य केले. महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि प्रकल्प परराज्यात गेले आहेत यावरूनही त्यांनी भाष्य केलं.
राज ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्राचं सोनं गेले अनेक वर्ष लुटलं जातंय. आम्ही फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटतोय. आपल्याकडे फक्त आपट्याची पानं उरलीयेत, सोनं दुसरेच घेऊन गेलेत. आम्ही कधी आमच्या स्वतःच्या आयुष्यात मश्गूल तर कधी जाती-पातीत मश्गूल. आजचा दसरा निवडणुकीच्या तोंडावर असल्यामुळं खूप महत्त्वाचा आहे. आता बेसावध राहून चालणार नाही. दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि राजकीय पक्ष आपापले खेळ करतात. महाराष्ट्राची प्रगती कुठं चाललीये? जरा बघा. नुसते रस्ते, पुल बांधले म्हणजे प्रगती होत नसते. मोबाइल, कलर टीव्ही हे गॅजेट्स आहेत, ती प्रगती नव्हे. प्रगती मेंदूतून व्हावी लागते. प्रगती समाजाची व्हावी लागते.
हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन
इतकी वर्ष राजकारण्यांनी प्रगतीच्या थापा मारूनही तुमच्याकडून राग व्यक्त होताना दिसत नाही. त्याच त्याच लोकांना दरवेळेस निवडून देता. त्यानंतर पश्चातापाचा हात डोक्यावर मारत राहायचा. आपण म्हणतो ना, पांडवांनी शमीच्या झाडावर शस्त्र ठेवली होती. जनताही मोक्याच्या वेळी शमीच्या झाडावर शस्त्र ठेवते. मतदानाचे शस्त्र मतदानाच्या दिवशी न वापरता, या सगळ्या लोकांना शिक्षा न करता शस्त्र ठेवून देता. मग निवडणुका झाल्या की, या लोकांवर बोलत राहता. पण मतदानाच्या दिवशी काय होतं? हा माझ्या जातीचा, हा माज्या समाजाचा, हा माझ्या ओळखीचा.. असं करून राज्य उभे राहत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
आज तुम्हाला संधी प्राप्त झाली आहे. तुम्ही सर्वांना संधी दिली. १३ तारखेला मनसेचा मेळावा होणार आहे, तेव्हा मी इतर गोष्टी बोलणार आहेच. पण दसऱ्याच्या निमित्ताने आज बोलत आहे. या निवडणुकीत मतदारांनी क्रांती केली पाहीजे. आजपर्यंत तुम्ही ज्यांना जोपासले ते तुमच्याशी प्रतारणा करत आले. तुम्हाला गृहित धरलं गेलं आणि हेच महाराष्ट्राचं अधिक नुकसान करत आलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्व वर्गाला हात जोडून विनंती आहे की, त्यांनी दसऱ्यानंतर येणाऱ्या निवडणुकात बेसावध राहू नका. शमीच्या झाडावरील शस्त्र उतरवून या सर्वांचा तुम्हाला वेध घ्यावा लागेल. गेली पाच वर्ष तुमच्या मतांशी ज्यांनी प्रतारणा केली, अपमान केला. वेड्यावाकड्या युत्या आणि आघाड्या केल्या. आज संध्याकाळी ते एकमेकांवर बोलतील, पण त्यात तुम्ही कुठे असणार आहात? मी अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न पाहतोय. त्यासाठी माझ्या सहकाऱ्यांना साथ द्या, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.





