पूल धोकादायक होता तर पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा सवाल

पुणे | पुण्यातील मावळमध्ये कुंडमळा या गावातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने काही पर्यटकांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ३८ जणांना वाचवण्यात बचाव पथक व पोलिसांना यश मिळालं आहे. दरम्यान, या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकार तथा प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
राज ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हणलं आहे की, काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
हेही वाचा : आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा
हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे…’पण मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग? असे सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं. आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं, असंही राज ठाकरे म्हणाले.