कुंडमळा पूल प्रकरणी पालकमंत्री अजितदादा गप्प का? संजय राऊतांचा सवाल

पुणे | पुण्यातील मावळमध्ये कुंडमळा या गावातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने काही पर्यटकांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ३८ जणांना वाचवण्यात बचाव पथक व पोलिसांना यश मिळालं आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
खासदार संजय राऊत म्हणाले, की पालकमंत्री अशा लहानसहान कामांमध्ये झोपलेले असतात. बिल्डर्सची कामं, ठेकेदारांची कामं यात पालकमंत्री झोपलेले असतात. काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण? हे अजित पवारांनी सांगितलं पाहिजे. तसंच सरकार याबाबतीत किती गंभीर आहे? त्या पुलाच्या निर्मितीसाठी कागदावर पैसे मंजूर केलेत मग पूल झाला का नाही? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? मतं विकत घ्यायला, आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे मिळतात. लाडक्या बहिणींची मतं विकत घ्यायला पैसे मिळत आहेत. मात्र एका पुलामुळे जे बळी गेले तो पूल दुरुस्त करायला पैसे मिळत नाहीत? असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा : पूल धोकादायक होता तर पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा सवाल
एक पत्र मला सापडलं आहे. ११ जुलै २०२४ रविंद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यांनी कुंडमळा रस्त्याचं काम आणि इंद्रायणी नदीवर पुलाला मंजुरी दिली. हे त्यांनी कुणाला कळवलं? रविंद्र भेगडे अध्यक्ष मावळ तालुका यांना कळवलं. मंत्री सही करतानाही झोपून असतात बघा. ८ कोटींचं काम आहे पण पत्रात उल्लेख आहे ८० हजार रुपयांचा. त्यामुळे किती गांभीर्य आहे बघा. माझा चष्म्याचा नंबर बदलेला नाही. तुम्हीही हे पाहून घ्या असं संजय राऊत पत्रकारांना म्हणाले. पीएने पत्र टाइप केलं, यांनी सही करुन टाकली. यात ८० हजारांचा उल्लेख आहे. हे पत्र मंत्री रवींद्र चव्हाण देतात. पूल कोसळून लोक वाहून गेले, मृत्यू झाले. हे सगळं या भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रति प्रेम आहे. अजित पवार काही बोलल्याचं मी पाहिलं नाही. पालकमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही? असाही सवाल संजय राऊत यांनी केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत पण तुमची चौकशी केली पाहिजे कारण तुम्ही आल्यापासून दुर्घटनांची मालिका राज्यात सुरु आहे. रविवारचे बळी हे भ्रष्टाचार आणि बेफिकिरीचे बळी आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.




