Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नाशिकची जमीन साधुग्रामच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव, राज ठाकरे यांचा गौप्यस्फोट

मुंबई: नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली तपोवन येथील जमीन जवळच्या उद्योगपतीच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा गौप्यस्फोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केला. तपोवनातील १८०० झाडे तोडण्यास मनसेने तीव्र विरोध केला असून सरकारने जर यावर संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेबरोबर मनसे उभी असेलच, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कुंभमेळयाच्या निमित्ताने तपोवन येथे ११५० एकर जागेवर साधुग्राम उभारण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी तपोवनातील १८०० झाले तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यास नाशिककरांनी तीव्र विरोध केला आहे. नाशिककरांच्या आंदोलनास राज ठाकरे यांनीही सक्रिय पाठिंबा देताना सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

कुंभमेळ्याचे कारण दाखवून झाडे तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची इतकाच विचार या सरकारचा असणार, नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरे काय सुरू आहे ? जमिनी गिळणे नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणे हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक दिसत आहेत. त्यामुळे निवडणूक असो वा नसो आमचा याला विरोधच राहिल. मनसे नाशिककरांच्या कायम पाठिशी उभी राहील. सरकारने जर यावर संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेबरोबर मनसे उभी असेल, असा विश्वासही त्यांनी नाशिककरांना दिला आहे.

हेही वाचा –  ‘शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे’; राज्यपाल आचार्य देवव्रत

ठाकरे यांनी समाजमाध्यमाच्या माध्यमातून नाशिकमधील वृक्षतोडीवर आपली संताप व्यक्त करताना, नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामे करताना जनतेला काय हवे आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतके उत्कृष्ट होते की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडे तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडे का तोडावी लागत आहेत, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली आहे.

ही झाडे तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडे लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असे कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडे लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडे लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, ती झाडे कुठे दिसली नाहीत, याकडेही ठाकरे यांनी सरकाचे लक्ष वेधले आहे.

नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील मनसेचा या वृक्षतोडीला विरोधच राहील. त्यामुळे सरकारने उगाच संघर्ष वाढवू नये, लोकांचे काय म्हणणे आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असे पहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button