‘..म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला’; प्रिया बेर्डेंनी सांगितलं राष्ट्रवाद सोडण्याचं कारण
![Priya Berde said that this is why I joined BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Priya-Berde-780x470.jpg)
मुंबई : मराठमोळ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी काही दिवसांपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला? यावर स्वत: प्रिया बेर्डे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी एका यूट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.
प्रिया बेर्डे म्हणाल्या, इथे (भाजपा) मला काम करण्यासाठी जास्त संधी वाटली. मला इथे जास्त चांगल्या पद्धतीनं ऐकलं गेलं. माझं म्हणणं ऐकण्यासाठी इथे लोकं भेटतात. मोठं-मोठे वरिष्ठ नेते, मग प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असूदे, फडणवीस साहेब असूदे हे सगळे भेटतात. हे तुमचं म्हणणं सगळं ऐकतात. एवढंच काय तर सुधीर मुनगंटीवार सुद्धा भेटतात; जे आपले सांस्कृतिक मंत्री आहेत. सांस्कृतिक विषयाबद्दल एवढं ज्ञान असलेला मी अजूनपर्यंत कोणता नेता बघितलेला नाही. आपल्या मनोरंजनसृष्टीबद्दल त्यांना खूप चांगलं ज्ञान आहे.
हेही वाचा – ‘ब्राह्मणांमध्ये संभाजी, शिवाजी नावं नाहीत’; छगन भुजबळ यांचे मोठं विधान
तुमची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होतं होती? असा प्रश्न विचारला यावर प्रिया बेर्डे म्हणाल्या, मी घुसमट नाही म्हणणार. कारण मी घुसमटणारी नाहीये. त्यामुळे मी बाहेर पडले. इथे मला चांगली संधी होती. ऐकून घेणारी माणसंही आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये मी दोन-अडीच वर्ष काम केलं. जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. खूप छोट्या पातळीवर काम केलं. पण तिथे मी खूप काम केलं. मग आता म्हटलं, इथे जर आपल्याला चांगली संधी मिळतेय. ते पण आणखी जास्त म्हणजेच जिल्हापातळी पेक्षा आपण प्रदेशभर चांगलं काम करू शकू.