‘व्होट जिहाद’चा काँग्रेसचा डाव; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप
![Prime Minister Narendra Modi said that vote jihad is a conspiracy of Congress](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Narendra-Modi-2-780x470.jpg)
मुंबई | हिंदू आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाचा विचार करून त्यामधील अधिकचा वाटा मुस्लिमांना देण्याची खेळी करणाऱ्या काँग्रेसने आता अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांच्या हक्काचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा डाव आखला आहे. त्यासाठी ते ‘व्होट जिहाद’ घडवू पाहात आहेत, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते कल्याण येथील महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने आपल्या सत्ता काळात हिंदू-मुस्लिमांच्या मतांच्या तुष्टीकरणासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची रचना केली होती. या अर्थसंकल्पातील १५ टक्के वाटा मुस्लिमांना देण्याचे नियोजन काँग्रेस सरकारने केले होते. हे मोठे पाप असल्याने आणि हा प्रकार देशामध्ये जातीय तेढ निर्माण करणारा, विकासाच्या खाईत लोटणारा असल्याने आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या वेळी या निर्णयाला विरोध केला होता. आता काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर तीच खेळी करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा – विकासकामांना चालना देण्यासाठी आचारसंहिता शिथील करा : आमदार महेश लांडगे
आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यांतील मतदानात जनतेने काँग्रेसला पार झिडकारले आहे. त्यामुळे काँग्रेससह त्यांच्या ‘शहजाद्यां’च्या पायाखालील जमीन सरकली आहे. हे शहजादे आता पुन्हा जुना खेळ बाहेर काढून देशातील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग यांच्या आरक्षणावर डोळा ठेवून आहेत. या आरक्षणासाठी काँग्रेसने कर्नाटकमध्ये मोठी प्रयोगशाळा उघडली आहे. कर्नाटकमध्ये सत्तेत येताच काँग्रेसने रातोरात वटहुकूम काढून मुस्लिमांना एका रात्रीत इतर मागास प्रवर्गाचा दर्जा दिला. अशा प्रकारे इतर मागास जातींच्या आरक्षणाचे तुकडे तुकडे करून काँग्रेसवाले ते मुस्लिमांना येत्या काळात वाटू पाहत आहेत. आरक्षणाची लूट करून काँग्रेसवाले मतांच्या तुष्टीकरणासाठी व्होट जिहाद खेळत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
कांदाप्रश्न गाजत असलेल्या दिंडोरी मतदारसंघातील या सभेत पंतप्रधान मोदी यांना कांद्यावर बोलणे भाग पडले. मागील पाच वर्षांत कांदा निर्यातीत ३५ टक्के वाढ झाली. दहा दिवसांपूर्वी निर्यात खुली झाल्यानंतर आतापर्यंत २२ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाल्याचे मोदी यांनी सांगितले. कांद्याचा राखीव साठा करण्याचे काम आम्ही सुरू केले. गतवर्षी सरकारने सात लाख कांदा खरेदी केला होता. यंदा पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे. कांदा निर्यातीसाठी वाहतुकीकरिता दिली जाणारी अनुदान योजना पुन्हा सुरू केली जाईल. नाशिकला द्राक्षांसाठी क्लस्टर योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही वाचा – कल्याणच्या सभेत नरेंद्र मोदींकडून आनंद दिघे यांचा उल्लेख; म्हणाले…
चार टप्प्यांतील मतदानात काँग्रेसचा दारुण पराभव होईल. त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही. हे लक्षात आल्यावर महाराष्ट्रातील एका नेत्याने किमान हे पद काँग्रेसकडे राखले जावे म्हणून लहान पक्षांना त्यात विलीन करण्याचे विधान केल्याचा टोला मोदी यांनी शरद पवार यांना हाणला. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काँग्रेसकडून आक्षेपार्ह विधाने केली जात असताना नकली शिवसेनेने त्यांच्यासमोर गुडघे टेकले, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.