ग्राऊंड रिपोर्ट : पिंपरीत ‘कमळ’ फुलवण्याची तयारी; महायुतीमध्ये मिठाचा खडा?
भाजपा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांचे यांचे ‘जोरदार ब्रँडिंग’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Mahesh-Landge-1-1-780x470.jpg)
विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंसह इच्छुकांची डोकेदुखी वाढणार
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार ‘ब्रँडिंग’ केले. त्यामुळे आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गोरखे भाजपाकडून उमेदवारीवर ‘क्लेम’ करणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे.
भारतीय जनता पार्टीचा पिंपरी विधानसभेतील उच्चशिक्षीत आणि क्लिन चेहरा अशी अमित गोरखे यांची ओळख आहे. २०१४ मध्ये राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर अमित गोरखे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळावर अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली होती. भाजपाचे ‘डिसिझन मेकर’ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गोरखे सलोख्याचे संबंध आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापन झाली. त्यानंतर अडीच वर्षे अमित गोरखे यांनी पिंपरी मतदार संघात पक्ष संघटनेसाठी काम केले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यावेळी गोरखे यांच्यावर पिंपरी विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मतदार संघातील परंपरागत प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात त्यांनी भाजपाची ‘व्होट बँक’ जमवण्यासाठी पुढाकार घेतला. त्याला यशही मिळाले आहे.
हेही वाचा – राज्यात अवकाळी पावसाला सुरूवात, बळीराजा चिंतेत
विशेष म्हणजे, २०१४ मध्ये राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर पिंपरी विधानसभा मतदार संघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी एकत्रितपणे लक्ष घातले होते. या मतदार संघातून महापालिकेच्या १८ पैकी १२ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मदतीने अमित गोरखे यांना स्थानिक पातळीवर मोठी ताकद मिळणार असून, गोरखे आगामी विधानसभा निवडणुकीत ‘डार्क हॉर्स’ ठरणार आहेत.
पिंपरी मतदार संघात पहिली ठिणगी..
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सहकाऱ्यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी विधानसभा मतदार संघात पहिली ठिणगी पडली होती. अमित गोरखे यांच्या पुढाकाराने पिंपरी मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपा परिवारातील मान्यवरांची बैठक झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी पिंपरीत राष्ट्रवादीशी जुळवून घेवू, अशी भूमिका घेण्यात आली. मात्र, भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी होणे पचनी पडलेले नाही. परिणामी, विद्यमान आमदार अण्णा बनसोडे आणि भाजपा यांच्यात दरी कायम आहे. याचा फटका महायुतीला बसणार आहे, अशी शक्यता राजकीय जाणकारांनी नोंदवली आहे.
विधानसभा निवडणूक स्वबळावर?
राज्यातील विधानसभा आणि महापालिका निवडणूक महायुतीचे घटकपक्ष अर्थात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदार संघातून अमित गोरखे ताकदीने कामाला लागले आहेत. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, उच्चशिक्षीत आणि दांडगा जनसंपर्क अशा बलस्थानामुळे गोरखे पिंपरीत ‘कमळ’ फुलवू शकतात, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. विशेष म्हणजे, वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गोरखे यांनी जोरदार ‘ब्रँडिंग’ केले आणि सर्वपक्षीय अनेक माजी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमातील उपस्थितांची यादी पाहता गोरखे आगामी निवडणुकीत माघार घेणार नाहीत, असे चित्र आहे.