‘..मग आरक्षण मागणारे लंगोटे घालून फिरणार का?’; प्रकाश शेंडगे यांचं विधान चर्चेत

मुंबई : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर टीका केली आहे. मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण पाहिजे असल्यास त्यांनी लंगोट घालून फिरायची तयारी ठेवावी, असं वादग्रस्त विधान प्रकाश शेंडगे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
प्रकाश शेंडगे म्हणाले, सुरुवातीला त्यांची मागणी होती की, आम्हाला निजामाच्या काळातील नोंदी बघून कुणबी आरक्षण द्यावं. तेवढीच त्यांची मागणी होती. ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना ओबीसी आरक्षण द्यावं हे आम्ही मान्य केलं होतं. एखादा असेल निजाम काळातला, निजाम काळातल्या पावणे दोन कोटी नोंदी तपासल्यानंतर फक्त ११ हजार नोंदी सापडल्या. त्यानंतर त्यांनी परत भूमिका बदलली. पूर्ण महाराष्ट्रात सरसकट ओबीसी आरक्षण पाहिजे. हे आम्हाला अजिबात मान्य नाही.
हेही वाचा – सोशल मीडियावर तासनतास वेळ घालवताय? ‘या’ टिप्स फॉलो करा सवयीपासून मुक्त व्हाल
कुणबी म्हणजे सामाजिक मागासलेले आहेत. यांचं कुणीही लंगोटी घालून फिरत नाही. तुम्ही आताही कोकणात गेलात तर आजही कोकणात कुणबी लंगोटी घालून फिरताना दिसेल. मग हे लंगोटी घालायला तयार आहेत का? तुम्हाला कुणबी आरक्षण हवं असेल तर दहा वर्ष लंगोट घालायला तुम्ही तयार आहात का? आमचा नाभिक समाज पिढ्यांपिढ्या सामाजिक भोग भोगतोय. मग आम्हाला कुणबी आरक्षण मिळालं. यांचे भोग तुम्ही भोगणार आहात का? तुम्ही हातात वस्तरा घेणार आहात का? नाही घेऊ शकतं. तुम्ही उच्च समाजातील आहात. तुम्ही क्षत्रिय आहात. मग तुम्ही कुणबी आरक्षणात कशाला येताय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाला आज घटनात्मक आरक्षण आहे. त्यांना ईडबल्यूएसचं १० टक्क्यांपैकी साडेआठ टक्के आरक्षण दिलेलं आहे. मराठा समाज तीन-तीन ठिकाणी आरक्षण घेत आहे, हे सगळं थांबवायला पाहिजे. आमचाही गरीब समाज आहे. मराठा समाजावर गरीबी ही तुमच्यात भावबंधकींनी आणलेली आहे. सामाजिक आरक्षण हा गरीबी हटाव कार्यक्रम मुळीच नाही. मराठा समाजातील काही घटकांनादेखील ओबीसी प्रमाणपत्र घेण्यास विरोध आहे. त्यामुळे त्या लढ्याची धार बोचट होत चाललेली आपल्याला दिसेल, असा दावा प्रकाश शेंडगे यांनी केला. तसेच सध्या सुरू असणाऱ्या अधिवेशनात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा. ओबीसी समाजाला मराठा समाजाप्रमाणे निधी मंजूर करावा, असं आव्हानही प्रकाश शेंडगेंनी केलं आहे.





