‘लोकसभेच्या ४८ जागा ताकदीने लढवणार’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
![Prakash Ambedkar said that he will contest 48 Lok Sabha seats with strength](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Prakash-Ambedkar-2-780x470.jpg)
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांनीही निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. यावरून, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीत हे एकत्र आले नाही तर आम्हाला ४८ जागा स्वबळावर लढवणार, असं ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळालं पाहिजे. यासाठी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र ही राज्ये महत्वाची आहेत. अन्य राज्यांत आपल्याला काम करता येणार नाही. पण, महाराष्ट्रात काम करता येईल.
हेही वाचा – ‘शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच’; अजित पवारांचं कोल्हेंना खुलं आव्हान
लोकसभा निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र यावं, ही माझी भावना आहे. पण, मला हे शक्य दिसत नाही. उद्या हे एकत्र आले नाही तर आम्हाला लोकसभेच्या ४८ जागा स्वबळावर लढवाव्या लागतील. त्याही ताकदीनं लढवल्या पाहिजेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, यावरून खासदार संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होणार आहे. आम्ही २३ जागा लढवणार असल्याचं दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत, याबद्दल दिल्लीत चर्चा झाली आहे.