पुणे गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत ‘हे’ घेतले महत्वाचे निर्णय
![Organized Ganeshotsav planning meeting in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/ajit-pawar-and-chandrakant-patil-1-780x470.jpg)
पुणे : गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. गणेश उत्सव मंडळांनी गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे. पुण्यात यासंदर्भात आज बैठक झाली. पुणे जिल्ह्यातील गणेश मंडळांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गणेशोत्सव साजरा करताना वाहतुकीला अडथळा येणार नाही याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी. मेट्रो प्रशासनाने उत्सव काळात मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याबाबत विचार करावा. गणेश मूर्तीच्या उंचीवर शासनाने कोणतीही मर्यादा घातलेली नाही, मात्र गणेश मूर्ती विसर्जन करताना प्रदूषण होणार नाही आणि उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल याची दक्षता घ्यावी. गणेश मूर्ती संकलनात जनतेच्या भावनांना धक्का लागणार नाही याकडेही लक्ष द्यावे.
धनकवडी भागातील मंडळांनी एकत्रितरित्या विसर्जन मिरवणूक काढण्याचा सुरू केलेला उपक्रम अनुकरणीय असून इतरही मंडळांनी तसा प्रयत्न करावा. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रस्त्यावरील उघडे चेंबर्स बंद करण्याची कारवाई त्वरित करावी. मिरवणूक मार्गावरील रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे कामही उत्सवापूर्वी करण्यात यावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही भागातील मार्गावर असलेली एकतर्फी वाहतूक शक्य असल्यास दुतर्फा सुरू करण्यात यावी. मानाच्या गणपतींसोबत इतरही मंडळांसोबतही खेळीमेळीचे वातावरण ठेवत त्यांच्या समस्या प्रशासनाने दूर कराव्यात. पुण्यातील गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव समजून सर्वांनी यात सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
हेही वाचा – मोशीत सैनिक हो तुमच्यासाठी…एक राखी जवानांसाठी!
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गणेश मंडळांकडून महानगरपालिकेने कमानीसाठी कोणताही कर आकारू नये. महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांशी समन्वय साधून त्यांच्या समस्या दूर कराव्यात. प्रशासनाने नियंत्रण मनोरे स्थापित करून त्या माध्यमातून नियोजनावर लक्ष ठेवावे. पोलीस मित्रांना प्रशिक्षित करून त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करावा.गणेश मंडळाने स्वतः नियमावली तयार करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच सर्वांनी मिळून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, गणेशोत्सवासाठी वाहतूक नियमन, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे याबाबत योग्य ते नियोजन करण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी व्हाट्सअँप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी काळजी घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिकाधिक मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांचे आवाहन…२/३ pic.twitter.com/SbLpIWwHuY
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 28, 2023
विक्रमकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.
आयुक्त विक्रमकुमार यांनी गणेश मंडळांना ५ वर्षासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. उत्सवादरम्यान वाहनतळासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने २३, २४, २६, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ध्वनिक्षेपक, वापरासाठी रात्री १२ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. मागील वर्षी ३ हजार ५६६ गणेश मंडळांची नोंदणी झाली होती. यावर्षीही तेवढ्याच प्रमाणात गणेश मंडळाद्वारे गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. बैठकीला विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.