पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोला वाढता विरोध!
ग्रामस्थांचे आयुक्तांना निवेदन; प्रशासन म्हणते… ‘शहराची गरज आहे’
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुनावळे येथे प्रस्तावित कचरा डेपोला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे पुनावळेचा कचरा डेपोचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची महापालिकेत भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनाची प्रत दिली. यावेळी विशाल काटे, शिवाजी बांदल, अतुल काटे, सचिन काटे, संतोष ढवळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
भुजबळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या पुनावळे येथे महाराष्ट्र शासन वनविभागाची २६ हेक्टर जागा आहे. या जागेवर प्रशासनाने मागणी केल्यामुळे सदर जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे. या जागेवर महापालिका प्रशासनाने २००८ रोजी कचरा डेपोसाठी आरक्षण टाकले आहे. २००८ रोजी पुनावळे येथे नागरीकरण झाले नव्हते. लोकवस्ती देखील कमी प्रमाणात होती. मात्र, गेल्या १५ वर्षांत या भागात विविध शैक्षणिक संस्था, मोठे गृह प्रकल्प, शेजारी हिंजवडी आयटी पार्कसह विविध सोयी-सुविधांनी सज्ज असा हा परिसर झाला आहे. पुनावळे येथे देशभरातील अनेक नागरिक नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत.
पाणी पुरवठा दुषित होण्याची शक्यता…
सध्या या उपनगराची लोकसंख्या जवळपास एक लाखाच्या आसपास झाली आहे. सध्य परिस्थितीत पुनावळे येथे कचरा डेपो झाल्यास येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची भिती आहे. तसेच रावेत येथील बंधाऱ्यामधून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरास पाणीपुरवठा केला जातो. या कचरा डेपोमुळे शहरातील सर्व नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा – Rain : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार, पुन्हा एकदा पावसाचे संकेत
प्रस्तावित कचरा डेपो रद्द करा…
सध्या वनविभागाच्या २६ हेक्टर जागेवरती अनेक प्रकारची दाट वृक्षे आहेत. सदर कचरा डेपो येथे निर्माण केल्यास या जागेवरील संपूर्ण वृक्ष तोड करावी लागेल. त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. तरी या सर्व बाबी विचारात घेवून पुनावळे येथे प्रस्तावित असणारा कचरा डेपो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. सर्व नागरिक आणि ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून सदर प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्रशासनाची भूमिका काय?
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात आहे. मोशी येथील कचरा डेपोवर ‘वेस्ट टू एनर्जी’, बायोमायनिंग, सीएन्डडी वेस्ट असे प्रकल्प राबवून कचरा समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. शहराची गरज ओळखून पुनावळेतील कचरा प्रकल्प कार्यान्वयीत करणे, काळाची गरज आहे. त्यामुळे कचरा डेपो रद्द करता येणार नाही. तसेच, कचरा डेपो म्हणजे कचरा त्या जागेवर साठवला जाणार नाही. आधी प्रकल्प सुरू केला जाईल. त्यानंतर कचरा त्या ठिकणी आणला जाणार आहे. मोशीतील परिस्थिती वेगळी होती. त्या ठिकाणी ३० वर्षांपासून कचरा साचला होता. पर्यावरणाचा ऱ्हास किंवा भूजलप्रदूषण होणार नाही. याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे फुरसुंगी, मोशी प्रमाणे पुनावळेतील कचरा प्रकल्पाबाबतही स्थानिक नागरिक आणि प्रशासन असा वाद निर्माण होणार आहे.
शिष्टमंडळ पुन्हा आयुक्तांना भेटणार…
दरम्यान, पुनावळेतील श्री भैरवनाथ मंदिरात स्थानिक नागरिक, सोसायटीधारक, ग्रामस्थ यांची बैठक दोन दिवसांपूर्वी झाली. यामध्ये कचरा प्रकल्पाला विरोध आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. त्यानुसार, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली कचरा प्रकल्प विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्याद्वारे महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसेच आमदार, खासदार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे. कचरा प्रकल्प ही शहराची गरज असली, तरी स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पुनावळे, ताथवडे, वाकड आणि रावेत भागातील नागरिकांसाठी कचरा प्रकल्प त्रासदायक ठरणार आहे, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.