शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओवरून नितेश राणेंचा ठाकरे गटावर गंभीर आरोप
![Nitesh Rane said that the mastermind behind making the video viral is in Kalanagar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/nitesh-rane-780x470.jpg)
व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मास्टरमांईंड कलानगरमध्ये आहे
मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. याचे पडसाद आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बघायला मिळाले. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.
शीतल म्हात्रेंचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. यासंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली असून त्या तक्रारीनुसार हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे मानस कुवर आणि अशोक मिश्रा ही दोन व्यक्ती असल्याचं पुढं आलं आहे. हे दोघेही ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. तसेच हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मास्टरमांईंड कलानगरमध्ये बसला आहे, असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.
जे ठाकरे गटाबरोबर राहतील, ते चांगले. जे त्यांना सोडून गेले, त्यांची बदनामी करण्याचा प्रकार फार पूर्वीपासून सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच मॉर्फ व्हिडीओ तुम्हालाच करता येतो, असं नाही. तुम्ही जर हा खेळ सुरू करत असाल, तर याचा शेवट आम्हाला करता येतो. आम्हीही रात्री ७.३० नंतरचे काही व्हिडीओ बाहेर काढू. ८ जून रोजीचे काही व्हिडीओ आमच्याकडे सुद्धा आहेत, असेही नितेश राणे म्हणाले.