शरद पवार यांना मोठा धक्का! प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा राजीनामा
![NCP state vice president Anil Gote resigns](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Anil-Gote-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करत शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील जवळपास ४० आमदार असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
अनिल गोटे म्हणाले की, भाजपमध्ये गटबाजी, गुंडाना खुलेआम समर्थन व संरक्षण तसेच प्रोत्साहन देण्याच्या मनोवृत्तीस कंटाळून आपण मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा व पक्षाचा राजीनामा देवून बाहेर पडलो होतो. राष्ट्रवादीत स्वेच्छेने प्रवेश घेतला. सलग चार वर्षे शरद पवारांचे नेतृत्व स्विकारले अर्थात लोकसंग्रामच्या सर्वच कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करण्याचा निर्णय मान्य होता असे नाही. पण केवळ माझ्या प्रेमापोटी सर्वच कार्यकर्त्यांनी आपली नाराजी माझे जवळ स्पष्ट शब्दात बोलून दाखविली. त्याच बरोबर ‘तुम्ही जेथे आम्ही तेथे’ अशी भूमिका स्विकारून माझ्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत झाले.
हेही वाचा – राहुल गांधींकडून संसदेत फ्लाईंग किस, स्मृती इराणींचा गंभीर आरोप
शिंदखेड्याचे आमदार माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या अवास्तव प्रशासकीय हस्तक्षेपाने दोंडाईचा, शिंदखेडा मतदार संघातील जनता त्रस्त झाली होती. यामुळे आपण ‘दहशतवाद मुक्त शिंदखेडा मतदार संघ’ ही भूमिका गावोगाव मांडल्याची आठवण करून दिली. आपण आपल्या वेळेचा सदुपयोग धुळेकर जनतेच्या रस्ता, पाणी, सार्वजनिक स्वच्छता या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी करू, असा निर्णय आपण आता घेतला आहे. यासाठई आपण आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या सेवेतून मुक्तता घेत असल्याचे पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वास कळविले आहे, असंही अनिल गोटे म्हणाले.