राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंचे स्वबळाचे संकेत…

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले, “महायुतीने काय करायचे हे त्यांचा विषय आहे, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आम्ही काय करणार तो आमचा अधिकार आहे. पुढच्या काळात त्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसून येतील.”
या वेळी बेालताना सुळे म्हणाल्या, की राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने १८ वर्षे राज्य केले. स्थानिक निवडणुका वेगवेगळ्या पद्धतीने लढल्या गेल्या. मागच्या वर्षी शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले. शेवटी निवडणुका कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या हातात असतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात व्यक्त केलेल्या गरजेनुसार स्वबळ या भूमिकेवर सुळे बोलत होत्या. या विधानामुळे विदर्भात महाविकास आघाडीत चिंता वाढल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून नागपुरात शक्ती प्रदर्शन केले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मेळावे जोरात सुरु आहेत.
हेही वाचा – ‘एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सुळे यांनी गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांवर बोलताना म्हटले, “मुळात कुणावर आरोप करायचे असेल, तर चॅनलवर करायचे का? संविधानावर देश चालतो; कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. ऑनलाईन कंप्लेंटही करता येतात.”
भाजपच्या बदलत्या स्वरूपावर, शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर प्रतिक्रिया
सुळे म्हणाल्या, “भाजप कधीकाळी सुसंस्कृत पक्ष होता, आज त्याचा चेहरा बदलला आहे. संसदेत एक नजर टाका व्हिजिटर गॅलरीमध्ये; अनेक मोठे नेते काँग्रेसीकृत झाले आहेत. सुषमा स्वराज आणि अटलजी हे माझ्या गुरुवर्य होते, त्यांच्याकडून आम्ही शिकलो. आजचे वातावरण पूर्णपणे वेगळे आहे.”
त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीबाबत स्पष्ट केले, “राज्यात शेतकरी कर्ज वसुली नको, ही माणुसकीची वेळ आहे. आम्हाला त्यात राजकारण करायचं नाही. आपण सगळ्यांनी त्यांच्या मदतीसाठी काम केले पाहिजे.”




