विधानसभा निवडणुकीत साधू संतांमुळे महायुतीला बहुमत मिळाले; नरेंद्र महाराज यांचे वक्तव्य

मुंबई | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं २८८ जागांपैकी १३२ जागा जिंकून आणल्या. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला ५६ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ४१ जागा मिळाल्या. पण महायुतीला मिळालेला हा अभूतपूर्व विजय लाडकी बहीण योजनेमुळे नसून साधू-संत, संघामुळे मिळाला असल्याचं विधान नरेंद्र महाराज यांनी केलं आहे. तसेच, आम्ही ठरवलं, तर राजकारण्यांना खुर्चीवरून खाली खेचू शकतो, असं नरेंद्र महाराज म्हणाले.
नरेंद्र महाराज म्हणाले, की राजकीय लोक आमचा आवाज दाबून टाकतात. त्यामुळे त्यांना घाबरून चालणार नाही. राजकीय उलथापालथ करणं गरजेचं आहे. आमचं हिंदूंचं रक्षण केलं नाही, तर आम्ही तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचू शकतो हा जनतेनं राजकीय लोकांपर्यंत संदेश पोहचवायला हवा.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील लघु उद्योजकांना लोकप्रतिनिधी- प्रशासनाचा ‘विश्वास’
गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत चित्र वेगळं होतं. पण विधानसभेच्या निवडणुकीत संघ आणि आम्ही सर्व साधू-संतांनी मिळून चित्र बदललं आहे. बाकी त्यांनी काहीही दावा करावा. लाडकी बहीण योजना वगैरे.. त्याचा मुळीच परिणाम नाहीये. आम्हा साधूसंतांचा हा परिणाम आहे. आम्ही सर्व साधू-संतांनी हिंदू धर्मातील लोकांना जागृत केलं की बदल ही काळाची गरज आहे. जागृत व्हा. त्यातून हे चित्र उभं राहिलं, असं नरेंद्र महाराज म्हणाले.
खुद्द अजित पवारांनाही खात्री नव्हती की त्यांच्या १० ते १२ जागा येतील. ते चित्र बदललं. एकनाथ शिंदेंना वाटतंय की लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना मोठा विजय मिळाला. तसं मुळीच नाहीये. आम्हा साधू-संतांचं त्यामागे योगदान आहे. मुस्लीम समाज हिंदू संपवण्यासाठी, आपल्या ऐक्यासाठी ज्यांना विरोध होतो त्यांच्यामागे हिरवे झेंडे घेऊन उभा राहात असेल तर आम्ही हिंदूंनी जागृत झालं पाहिजे. संतांनी जागृत झालं पाहिजे. आम्ही ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं. त्यातून विधानसभेला चित्र बदललेलं दिसलं, असंही नरेंद्र महाराज म्हणाले.