“देवेंद्र फडणवीसांची पोलीस दलावर पकड नाही”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा
मुंबई : काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असून गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा, असं नाना पटोले म्हणाले.
लोकप्रतिनिधींना लोकांमध्ये जावे लागते, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, विविध कार्यक्रमासाठी त्यांना जनतेमध्ये फिरावे लगते, पण असे हल्ले होत असतील तर लोकप्रतिनीधींनी काम कसे करायचे, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.
आमदार प्रज्ञा सातव तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात गाडीवर दगडफेक करण्यात आली. असे प्रकार वाढत असून गुन्हेगारांवर सरकारचा वचक राहिलेला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली असून केवळ सत्ताधारी नेत्यांना सुरक्षा पुरविली जात आहे, असंही नाना पटोले म्हणाले.





