‘आयोध्येतील बाबरी मशिदीची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी करावी’; मुस्लिम लीगची मागणी
![Muslim League demands that Prime Minister Modi should lay the foundation of Babri Masjid in Ayodhya](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Babri-Masjid-in-Ayodhya--780x470.jpg)
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या बाबरी मशीदीची पायाभरणी करावी अशी विनंती इंडियन मुस्लिम लीगकडून करण्यात आली आहे.
भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा जानेवारीत होणार असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत. त्यावेळीच मशिदीची पायाभरणी मोदींनी करावी, अशी विनंती मुस्लीम समाजाकडून करण्यात आली आहे. इंडियन मुस्लिम लीगचे अध्यक्ष मोहम्मद इस्माईल अन्सारी म्हणाले, आमचे पंतप्रधान एका शुभ मुहूर्तावर अयोध्येत येत आहेत. आम्ही त्यांना मशिदीचेही काम सुरू करण्याची विनंती करतो. ही आमची मनापासून इच्छा आहे.
हेही वाचा – ‘अग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत
जामा मशिदीचे इमाम अहमद बुखारी आणि अखिल भारतीय इमाम संघटनेचे अध्यक्ष डॉ. इलियासी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धन्नीपूर मशिदीची पायाभरणी करण्याची इंडियन मुस्लिम लीगचे कार्यवाहक प्रदेशाध्यक्ष नजमुल हसन गनी यांनी विनंती केली आहे.