TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

महापालिका निवडणुकीची चाहुल अन्‌ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड दौरा!

मिशन महानगरपालिका : कामगार नगरीमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी लढतीची शक्यता!

पिंपरी- चिंचवड : अविनाश आदक । आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याआधीच सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे उद्या (शनिवार, २३ ऑगस्ट) पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात “स्वच्छ सन्मान सोहळा व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ पूर्वतयारी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसं पाहिलं तर हा कार्यक्रम स्वच्छ भारत अभियानाचा भाग असला, तरी त्यामागे राजकीय डावपेच आणि भविष्याची रणनीती स्पष्ट होणार आहे. विशेषतः, पिंपरी-चिंचवडचा ‘बालेकिल्ला’ पुन्हा आपल्या ताब्यात आणण्याचा अजित पवार यांचा संकल्प आहे. मागील काही निवडणुकांमध्ये हातातून निसटलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची पकड मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या विश्वासात पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी अशा कार्यक्रमांचा वापर मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग आहे, हे स्पष्टपणे दिसते.

या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत, असे महानगरपालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रसिद्ध केले आहे. याशिवाय महापालिकेतील माजी व सध्याचे नगरसेवक, स्थानिक नेते, सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांचाही मोठा सहभाग अपेक्षित आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला नुकतेच स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये देशात ७ वा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याचा सन्मान मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सहभागाने साकारलेली ही यशोगाथा पुढील निवडणुकांमध्ये मतांत रुपांतरित करण्याचा प्रयत्न अजित पवार आणि त्यांच्या टीमकडून होईल, यात शंका नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांशी थेट संवाद, जनतेच्या प्रश्नांना समजून घेणे आणि विकासकामांचा आढावा घेण्यासोबतच, राजकीय वातावरण तापवण्याची तयारीही सुरू झाली आहे.

अजित पवार यांच्या दौऱ्याचे राजकीय संकेत…

हा दौरा केवळ औपचारिकता नसून, त्यातून राष्ट्रवादीच्या स्थानिक संघटनला बळकटी देणे, कार्यकर्त्यांना एकजूट करणे आणि स्वच्छतेच्या यशाच्या निमित्ताने प्रशासनाबरोबर आपली उपस्थिती दाखवणे – हे मुख्य उद्दिष्ट आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक आणि नागरी भागात जनमतातून पुन्हा स्थान मिळवणे हे अजित पवारांसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.

सर्वपक्षीय आमंत्रण… पण कोण उपस्थित राहणार?

स्वच्छ सर्वेक्षण व स्वच्छ सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आले आहे. भाजपाचे विधानसा व विधान परिषद असे सर्व आमदार, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खासदार व नेत्यांची नावे महानगरपालिकेच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत झळकत आहेत. मात्र, हे सर्व नेते आणि लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात कार्यक्रमाला हजेरी लावणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेषतः सध्या शहरात राजकीय स्थित्यंतरे, पक्षांतराचे वारे आणि आगामी महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता, कोण सहभागी होतो आणि कोण दूर राहतो? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. कारण, भाजपा- राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांची महायुती राहणार की स्वबळाचा नारा असणार… याचे संकेत उद्याच्या कार्यक्रमात मिळणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button