चाकण वाहतूक कोंडीच्या मुद्यावरून खासदार अमोल कोल्हे पुन्हा ‘‘ट्रोल’’
“निविदा प्रक्रिया लवकरच होईल” या आश्वासनाने आम्ही विटलो : प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरूच नाही, खासदारांची केवळ चमकोगिरी
पुणे । विशेष प्रतिनिधी : चाकण, तळेगाव आणि राजगुरुनगर परिसर – हे महाराष्ट्राचे औद्योगिक इंजिन मानले जाते. येथे कार्यरत असलेल्या MIDC वसाहती आशिया खंडातील काही मोठ्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये गणल्या जातात. या भागातून सरकारला हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळतो. पण इतकं महत्त्वाचं क्षेत्र असूनही, चाकण ते नाशिक फाटा दरम्यानच्या वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न वर्षानुवर्षे तसाच आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि सोशल मीडियावर पोस्ट केली. यावर नेटिझन्स आणि चाकण औद्योगिक पट्टयात प्रवास करताना वैतागलेल्या वाहनचालक-कामगार वर्गाने टीकेची झोड उडवली आहे.
चाकण औद्योगिक पट्टयातील कोंडी ही बाब केवळ स्थानिकांनाच नव्हे, तर उद्योग, कामगार, आपत्कालीन सेवा यांना देखील अडचणीत आणणारी ठरते. रस्त्यांची दयनीय अवस्था, वाहतूक नियोजनाचा अभाव आणि प्रलंबित प्रकल्पांचा गोंधळ – यामुळे हा परिसर अक्षरशः मृत्यूमार्ग बनला आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी आत्मचिंतन करावे का?
खासदार डॉ. अमोल कोल्हे 2019 पासून या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचे उच्च शिक्षण, उत्तम वक्तृत्व आणि सामाजिक जाण असलेला नेता ही ओळख असूनही, गेल्या सहा वर्षांत नाशिक फाटा ते चाकण या औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यात त्यांना अपयश आलेले दिसते. परिणामी, स्थानिकांकडून आता हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की – “इतक्या वर्षांत ठोस कृती का झाली नाही?” “केंद्र सरकारशी समन्वय, निधी मिळवणे, नियोजनात गती – यात अडथळे का आले?” ही वेळ आहे की खासदारांनी आत्मचिंतन करावं, आणि केवळ आश्वासनं नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीसाठी स्पष्ट रोडमॅप जाहीर करावा.
गडकरींचं आश्वासन – ‘लवकरच निविदा प्रक्रिया’
खासदार कोल्हे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांनी पुणे-नाशिक महामार्गाचे रखडलेले काम सुरू करण्याची आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर रस्ता NHAI कडे देण्याची विनंती केली. गडकरींनी दिलेले आश्वासन – “अडथळे दूर झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होईल” – हे नागरिकांना नवीन वाटत नाही. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून हेच शब्द ऐकून लोक अक्षरश: कंटाळले आहेत.
नेटकऱ्यांचा संताप… “महासत्ता व्हायचंय, पण चाकण सुटत नाही!”
संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर लोकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. “निविदा प्रक्रिया लवकरच होईल” हे अमृतवचन गेल्या वर्षभरात इतक्या वेळा ऐकलंय की आता रस्ता नाही झाला तरी चालेल! “एक चाकण चौक सुटत नाही, आणि आपण महासत्ता होणार म्हणतो!” “हजारो कोटींची कमाई करणाऱ्या MIDC चा रस्ता खड्ड्यात – ही विडंबना नाही का?”
अपघातांचं वाढतं प्रमाण – जबाबदार कोण?
या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून अनेक बळी गेले आहेत. वाहतूक नियोजनाचा अभाव, प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांचं राजकारण आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा अपुरा दबाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. चाकण औद्योगिक पट्ट्याचा प्रश्न फक्त स्थानिक नाही – तो राज्याच्या आणि देशाच्या औद्योगिक भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता लोक विचारत आहेत. “कोणी भेटलं, काय बोललं” पेक्षा “कोणी काय केलं?” जनतेला हवी आहे कृती – आश्वासनं नव्हे, अशी टीका समाजमाध्यमांवर होताना दिसते आहे.








