मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला गोळ्या घालण्याची घमकी

३० लाख रूपयांची मागितली खंडणी
पुणे : मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाला गोळी घालून ठार मारण्याची धमकी देत ३० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी चार मोबाईल फोन धारकांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रुपेश वसंत मोरे (वय २१, रा. कृष्ण लीला, कात्रज गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश यांना त्यांच्या व्हाट्सअप नंबरवर ७ फेब्रुवारी रोजी आरोपींनी फोन केला. आरोपींनी ‘आल्फीया शेख या मुलीसोबत तुझा विवाह झाला असून ग्रामसेवक, ग्रामपंचायत, वडगाव, सोयगाव, जिल्हा औरंगाबाद येथील महाराष्ट्र शासनाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाठवले. हमने आपके नाम का मॅरेज सर्टिफिकेट बनाया है. खराडी युवान आयटी पार्क के सामने इनोवा मे बीस लाख रुपये रख देना. आपने नही दिया तो अल्फिया आप पर किस कर देगी’, असा धमकीचा मेसेज केला.
त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पुन्हा त्यांच्या व्हाट्सअप वर ‘मै अल्फिया शेख हुं तुने ३० लाख रुपये नही दीए तो तुझे रेप केस मे अंदर कर दुंगी. खराडी युआन आयटी पार्क के सामने डर्क लाईन प्लॉट के अंदर इनोव्हा (एमएच १२, क्यूआर ७८६०) मे ३० लाख रुपये रख देना. पैसे नही रखे तो मॅरेज सर्टिफिकेट व्हायरल कर देंगे’, असा धमकीचा मेसेज केला. त्यानंतर पुन्हा ५ मार्च रोजी व्हाट्सअपवर ‘दे रहा क्या पैसा? नही तो मार दूंगा. तेरी पुरी सेटिंग हुई है. बहुत जल मार देंगे. तेरे को गोलीमार के जायेंगे. तेरे बाप को बोल देंगे तेरे को बचाने के लिए’, असा धमकीचा मेसेज करून ३० लाख रुपये खंडणीची मागणी केली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.