‘किंग होणं सोपं पण किंगमेकर होणं नाही’; निलेश लंकेंची जोरदार फटकेबाजी

पुणे | लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत. अहमदनगर येथील जागा निलेश लंकेंनी जिंकली. निलेश लंकेंनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. निवडणुकीपुर्वी बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावर फेटा बांधल्यावरच मी फेटा बांधेन असं ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच लंके यांनी फेटा बांधला. यावेळी बोलताना त्यांनी तुफान फटकेबाजी केली.
निलेश लंके म्हणाले, मी विजयी झालो मात्र विजयाचा आनंद मला आता खऱ्या अर्थाने मिळाला. विजयानंतर मी आजपर्यंत माझ्या डोक्यावर कुणालाही फेटा बांधू दिला नाही. मी सुध्दा थोरात यांच्यापेक्षा दहा पट हट्टी आहे. कौरव पांडवांच्या युद्धात पांडवांचा विजय श्रीकृष्णामुळे झाला. माझ्या निवडणुकीत श्रीकृष्णाची भूमिका पार पाडली ती बाळासाहेब थोरात यांनीच. माझ्या मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा काम करत होती. त्यांनी काय काय काम केलं, हे मला निकालानंतर सगळं समजलं.
हेही वाचा – पुण्यात अपघातांचं सत्र सुरूच, मर्सिडीजच्या गाडीखाली चिरडून दुचाकी चालकाचा मृत्यू
मी विजयी झालो त्यावेळेस बाळासाहेब थोरात आजारी होते. त्यांना खूप आग्रह केला मात्र ते येऊ शकले नाहीत. कारमध्ये सलाईन घ्या.. इंजेक्शन घ्या हे पण तुम्ही या असा माझा आग्रह होता. म्हणूनच, ज्या माणसाने मला दिल्ली दाखवली त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज संगमनेर मध्ये आलोय. किंग होणं सोपं आहे, मात्र किंगमेकर होणं अवघड, असंही निलेश लंके म्हणाले.





