पार्थ पवार राज्यसभेवर? आमदार रोहित पवारांचा खोचक टोला; म्हणाले..

मुंबई | काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने राज्यसभेसाठी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. यावरून, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार का? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर रोहित पवार म्हणाले, राज्यसभेवर विचारवंतांना पाठवलं जातं, वेगवेगळे पक्ष अभ्यासू लोकांना राज्यसभेवर पाठवतात. अशा लोकांना राज्यसभेवर पाठवल्यास त्याचा पक्षाला फायदा होतो. पार्थ पवारही असेच उमेदवार आहेत. एखादा असा विचारवंत व्यक्ती राज्यसभेवर जात असेल तर त्याचा महाराष्ट्राला आणि देशाला फायदा होऊ शकतो. पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवावं असं अजित पवार यांचं मत असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा. तो त्यांचा व्यक्तीगत विषय आहे.
हेही वाचा – ‘मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय’; नारायण राणेंची टीका
दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाने मिलींद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





