महापालिका अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आमदार लांडगे सरसावले!
विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेण्याची मागणी
![MLA Mahesh Landge rushed for the promotion of municipal officials](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Mahesh-Landge-780x470.jpg)
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना सूचना
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातील सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांची विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक घ्यावी व पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता यांची विभागीय पदोन्नती समितीची बैठक (डीपीसी) झाली होती. त्यानंतर सहशहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता, उपाभियंता यांची डीपीसी होणे अपेक्षीत होते. मात्र, झालेली नाही. तसेच, संबंधितांना त्या-त्या विभागाचा चार्जही दिलेला नाही.
हेही वाचा – ‘फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा’; अमोल कोल्हेंची मागणी
महापालिका सेवेतील काही कार्यकारी अभियंता व उपअभियंता सेवा निवृत्त झाले आहेत. त्यामुळे सह शहर अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या जागा रिक्त आहेत. कामाची व्याप्ती व कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने सदरच्या जागा भरणे आवश्यक आहे. सदर अधिकाऱ्यांची डीपीसी आणि पुढील कार्यवाही करावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.
पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या ३० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरती विकास कामे आणि प्रकल्पांचा प्रचंड ताण आहे. महापालिका कारभारातील सुसूत्रता आणि गतिमानता या दृष्टिकोनातून रिक्त पदांवरती तात्काळ अधिकारी नियुक्त करणे आणि त्यांना जबाबदारींचे वाटप करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने विभागीय पदोन्नती समितीची बैठक घ्यावी व पुढील कार्यवाही करावी अशी सूचना केली आहे.
महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा. भाजपा, पिंपरी-चिंचवड.