मिशन PCMC: इंद्रायणीनगरमध्ये कोण करणार विजयाचे ‘सीमोल्लंघन’
ग्राऊंड रिपोर्ट : सावळे-मडिगेरी-लांडे- लोंढे-सहाणे-वाबळे यांच्यात चुरस
पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. ऑक्टोबरमध्ये हरकती आणि सूचनांची सुनावणी होईल आणि सदरची प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत आणि निवडणूक आचारसंहिता सुरू होईल. ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष स्वबळावर लढवतील, असे चित्र आहे. डिसेंबरमध्ये मतदान आणि जानेवारी-2026 मध्ये महानगरपालिकेत नवीन महापौर विराजमान होतील. या निमित्ताने ‘‘महाईन्यूज’’ च्या माध्यमातून प्रभागनिहाय राजकीय स्थितीबाबत विश्लेषण पहिला ‘‘ग्राऊंड रिपोर्ट’’ प्रसिद्ध करीत आहोत.
2017 च्या निवडणुकीप्रमाणे प्रभाग ‘‘रचना जैसे थे’’ आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोणताही बदल नाही. ज्याअर्थी 2017 प्रमाणे प्रभाग निश्चित झाले आहेत. त्यासाठी 2011 ची जनगनना ग्रहीत धरली आहे. तत्कालीन जनगननेनुसार, प्रभागाची लोकसंख्या 50 हजार 164 इतकी दर्शवण्यात आली आहे. त्यापैकी 7 हजार 191 इतकी अनुसूचित जाती आणि 1 हजार 90 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, 2017 मध्ये शहरात भाजपाची मोठी लाट होती. या प्रभागातून भाजपाचे तीन नगरसेवक निवडून आले होते. प्रभागातील अ- गटातून भाजपाच्या तिकीटावर सीमा सावळे यांनी 9 हजार 806 मते मिळवत, राष्ट्रवादीच्या सविता झोंबाडे यांचा पराभव केला होता. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर सीमा सावळे यांना पहिल्यांदा स्थायी समिती सभापतीपदी संधी देण्यात आली. त्यानंतरच्या काळात सावळे आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. महापालिका प्रस्तावित निवडणूक 2022 मध्ये सावळे यांनी भाजपाविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सावळे यांनी पिंपरी विधानसभेतून जोरदार तयारी केली होती. मात्र, त्यांना प्रस्थापित पक्षांकडून तिकीट मिळाले नाही.
प्रभागातील ब- गटातून भाजपाच्या नम्रता लोंढे यांनी 10 हजार 642 मते मिळवत, राष्ट्रवादीच्या सोनाली उदावंत यांचा पराभव केला होता. तसेच, क-गटातून भाजपाच्या विलास मडिगेरी यांनी 9 हजार 358 मते घेतली आणि राष्ट्रवादीच्या संजय वाबळे यांचा पराभव केला होता. भारतीय जनता पार्टीकडून मडिगेरी यांना पक्षाचा निष्ठावंत म्हणून स्थायी समिती सभापतीपदी संधी देण्यात आली होती.
माजी आमदार विलास लांडे यांचे चिरंजीव विक्रात लांडे यांनीही याच प्रभागातून निवडणूक लढवली होती. भाजपाकडून सारंग कामतेकर यांच्या विरोधात 7 हजार 933 मते मिळवत विक्रांत लांडे यांनी ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजित गव्हाणे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी अजित पवार गटात सहभाग घेतला आहे. याच गटातून विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे तत्कालीन समर्थक तुषार सहाणे यांनी ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांना 7 हजार 586 मते मिळाली आहेत. अवघ्या 347 मतांनी सहाणे यांचा पराभव झाला आहे. सहाणे सध्या शिवसेना ठाकरे गटात आहेत.
2017 च्या निवडणुकीत अ- अनुसूचित जाती महिला, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग, क- सर्वसाधारण आणि ड- सर्वसाधारण असे आरक्षण होते. या प्रभागात बालाजीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा झोपडपट्टीचा परिसर आणि सोसायटीधारक असा संमिश्र मतदार आहे.
गेल्या तीन टर्म आम्ही लोकांसाठी काम करीत आहोत. लोकांचा संपर्क आणि केलेली कामे याच्या जोरावर मी आणि माझे पॅनेल निर्विवादपणे निवडून येईल. ‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह’ या संकल्पनेतून प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही सातत्त्याने प्रयत्न केले आहेत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. मधल्या काळात काही मतभेद झाले असतील, पण मी आहे तिथेच आहे. आम्ही लढू आणि जिंकू..!
– सीमा सावळे, माजी नगरसेवक.
राज्याचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वामध्ये शहराचा आणि माझ्या प्रभागाचाही विकास झाला. प्रभागातील विविध विकासकामे आम्ही मार्गी लावली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रभागात तुल्यबळ ताकद आहे. सर्वसामान्य व सुशिक्षित नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आमचे चारही नगरसेवक निवडून येतील.
– विक्रांत लांडे, माजी नगरसेवक.
गेली 20 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये प्रस्थापित उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ‘तुषार सहाणे यांचा बळीचा बकरा बनवला’’ अशी भावना नागरिकांमध्ये आहे. सत्तेत नसतानाही मी लोकांच्या संपर्कात आहे. लोकांची कामे करीत आलो आहे. 1991 पासून या प्रभागातच राहतो. त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची साथ आहे. माझे पॅनेल बहुमताने निवडून येईल.
– तुषार सहाणे, इच्छुक उमेदवार.







